वृत्तसंस्था/ टेरासा, स्पेन
हॉकी संघाने नेदरलँड्सचा 2-1 ने पराभव करून 100 व्या वर्धापनदिनानिमित्त स्पॅनिश हॉकी महासंघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंग (15 वे मिनिट) याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर दिलप्रीत सिंग (50 वे मिनिट) याने विजयी गोल केला. थियरी ब्रिंकमनने (25 वे मिनिट) डच संघाला बरोबरी साधून दिली, परंतु त्याच्या संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
पुऊष हॉकीमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताला तीन संघांच्या गट स्तरावर दोन गुणांसह शेवटच्या स्थानावर राहावे लागले होते. त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत त्यांनी पाऊल ठेवले. नेदरलँड्ससोबतचा सामना 1-1 असा बरोबरीत सोडविण्यापूर्वी हरमनप्रीत सिंगच्या संघाला पहिल्या सामन्यात स्पेनकडून 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता. अंतिम साखळी सामन्यात त्यांना इंग्लंडविरुद्धही बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने अंतिम फेरीत त्यांना प्रवेश मिळाला नव्हता.
ताज्या लढतीत भारतीय हॉकी संघाने नेदरलँड्सवर दबाव आणताना त्यांच्या आक्रमक वृत्तीचे प्रदर्शन घडविले. पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटात पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीतने डच गोलकीपर मॉरिट्स व्हिसरला चकवून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापूर्वी पाच मिनिटे आधी पेनल्टी कॉर्नरवर डच संघाने बरोबरी साधली. यावेळी ब्रिंकमनने चेंडू ड्रॅग-फ्लिक करून जाळ्यात टाकला. मध्यंतरानंतर भारताने दबाव टाकणे सुरूच ठेवताना भेदक पासेसचे दर्शन घडविले. परंतु नेदरलँड्सच्या बचावफळीने भारताचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरविला.
शेवटी सामना संपण्यास पाच मिनिटे असताना दिलप्रीत सिंगने डच गोलरक्षकाला नमवून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणात गोल स्वीकारावा लागल्याने धक्का बसलेल्या नेदरलँड्स संघाने त्यानंतर बरोबरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण भारताने भक्कमपणे बचाव करून विजय नोंदविण्यात यश मिळविले.