Tarun Bharat

भारतीय पुरुष टेटे संघाचा जर्मनीला धक्का

Advertisements

महिला संघाचाही झेक प्रजासत्ताकवर विजय

वृत्तसंस्था/ चेंगडू, चीन

स्टार टेबल टेनिसपटू जी. साथियनने एकेरीचे दोन्ही सामने जिंकून दिल्यामुळे भारताने विश्व सांघिक टेबल टेनिस चॅम्पियनशिमध्ये जागतिक द्वितीय मानांकित जर्मनीला 3-1 असा पराभवाचा धक्का देत साखळी फेरीतील दुसरा विजय नोंदवला. साथियनने जागतिक नवव्या मानांकित डँड कियुवर विजय मिळविला. भारताच्या महिला टेटे संघानेही साखळी फेरीतील पहिला विजय नोंदवताना झेक प्रजासत्ताकवर 3-0 अशी मात केली.

जागतिक क्रमवारीत 37 व्या स्थानावर असणाऱया साथियनने दोन अटीतटीचे सामने जिंकले. प्रथम त्याने 36 व्या मानांकित डुडा बेनेडिक्टचा 11-13, 4-11, 11-8, 11-4, 11-9 असा पराभव केला. नंतर जर्मनीचा सर्वोच्च मानांकित खेळाडू डँग कियुवर 10-12, 7-11, 11-8, 11-8, 11-9 अशी मात केली. दोन्ही सामन्यात साथियनने पहिले दोन गेम्स गमविल्याने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारत शानदार विजय नोंदवले. ‘कियुविरुद्धचा सामना निश्चितच जास्त अवघड होता. तो टॉप टेनमधील खेळाडू आहे आणि तो अतिशय दर्जेदार सामना होता,’ असे साथियन नंतर म्हणाला.

भारताचा द्वितीय मानांकित हरमीत देसाईने दुसरा एकेरीचा सामना गमविला होता. त्याला कियुने 7-11, 9-11, 13-11, 3-11 असे हरविले. पण मानव ठक्करने रिकार्डो वाल्दरचा 3-1 (13-11, 6-11, 11-8, 12-10) असा पराभव करून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 17 वे मानांकन मिळालेल्या भारताने पहिल्या लढतीत उझ्बेकस्तानवर मात केली होती. उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला टॉप दोनमध्ये स्थान मिळविण्याची गरज आहे.

महिला संघाचा झेकवर विजय

महिला विभागात भारतीय टेटे संघाने झेक प्रजासत्ताकचा 3-0 असा पराभव करून साखळी फेरीतील पहिला विजय मिळविला. भारतीय महिलांचा गट 5 मध्ये समावेश आहे. पहिल्या लढतीत त्यांना जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय महिलांची पुढील लढत सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी इजिप्तविरुद्ध होईल.

झेकविरुद्धच्या लढतीतील पहिल्या सामन्यात मनिका बात्राने हॅना मॅटेलोव्हाचा 11-6, 11-6, 8-11, 12-10 असा पराभव करून भारताला आघाडीवर नेले. दुसऱया सामन्यात युवा सेन्सेशन ठरलेल्या श्रीजा अकुलाने मर्केटा सेवसिकोव्हावर 11-5, 11-3, 11-8 असा शानदार विजय मिळवित ही आघाडी 2-0 अशी केली. दिया चितळे व कॅटरिना टोमानोवस्का यांच्यातील सामना अतिशय चुरशीचा झाला. चितळेने हा सामना 11-13, 15-13, 12-10, 14-12 असा जिंकून झेकवरील विजय निश्चित केला. यातील प्रत्येक गेम अटीतटीचा झाला. पहिला गेम चितळेने अगदी थोडक्यात गमविला. पण दुसरा गेम जिंकून चितळेने 1-1 अशी बरोबरी साधली आणि नंतरच्या दोन गेममध्ये संघर्ष करावा लागला तरी चितळेने बाजी मारत सामना जिंकला.

Related Stories

अर्सेनलचा एकतर्फी विजय

Patil_p

पुढील हंगामापासून महिला आयपीएलचे आयोजन

Amit Kulkarni

चेन्नई सुपरकिंग्स-पंजाब किंग्स यांच्यात आज लढत

Patil_p

कसोटी मानांकनात भारत तिसऱया स्थानी

Amit Kulkarni

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा पराभव

Patil_p

बेन स्टोक्सचा डरहॅमशी आणखी 3 वर्षांचा करार

Patil_p
error: Content is protected !!