7.3 टक्केचा अंदाज : चलनवाढीचे कारण
नवी दिल्ली
जागतिक रेटिंग एजन्सी एस ऍण्ड पी यांनी चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदराचा नवा अंदाज 7.3 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी एजन्सीने 7.8 टक्के इतका वृद्धी दर घोषित केला होता. वाढती चलनवाढ व रशिया आणि युक्रेन यांच्यामधील दीर्घकालावधीपासून सुरु असणाऱया युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेत एस ऍण्ड पी यांनी नवा अंदाज सादर केला आहे.
एस ऍण्ड पी यांनी आपल्या ‘ग्लोबल मेक्रो अपडेट टू ग्रोथ फोरकास्ट्स’मध्ये म्हटले आहे, की मागील काही कालावधीपासून चलनवाढीचा दर उच्चांकी राहिला आहे. यामुळे हा काहीसा चिंतेचा विषय राहिला आहे. यासोबतच केंद्रीय बँकेने रेपो दर वाढवला आहे याचा प्रभाव हा उत्पादन तसेच रोजगारावर नकारात्मक राहिला आहे.
मागील आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये रेटिंग एजन्सीने 2022 ते 23 करीता भारताचा जीडीपी दर अंदाज 7.8 घोषित केला होता. आता मात्र यामध्ये घट करत तो 7.3 टक्के केला आहे. यासह आगामी आर्थिक वर्षासाठी हा वृद्धीदर 6.5 टक्के राहणार असल्याचे मांडले आहे.