Tarun Bharat

ब्रिटनमध्ये आता ‘ऋषि’राज्य

सुनक होणार त्या देशाचे पहिले ‘हिंदू’ पंतप्रधान, 28 ऑक्टोबरला शपथविधी

लंडन / वृत्तसंस्था

ऋषि सुनक या हुजूर पक्षाच्या नेत्यांना ब्रिटनचे पंतप्रधान होण्याचा मान मिळणार आहे. लीझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर चारच दिवसात त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली. सत्ताधारी हुजूर पक्षातील त्यांचे सर्व प्रतिस्पर्धी स्पर्धेतून बाहेर गेल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते ब्रिटनचे प्रथम हिंदू पंतप्रधान होणार आहेत. त्यांचा शपथविधी शुक्रवार, 28 ऑक्टोबरला होणार आहे. दिवाळीच्या प्रथम दिवशी भारतासाठीही ही आनंददायक घटना आहे.

नवा नेता निवडण्यासाठी हुजूर पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक येथे झाली. या बैठकीत ऋषि सुनक यांच्या नावाला संमती देण्यात आली. त्यामुळे त्यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यांना त्यांच्याच पक्षातील नेत्या पेनी मॉरडाँट यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तथापि, सुनक यांना कनिष्ठ सभागृहातील (हाऊस ऑफ कॉमन्स) त्यांच्या पक्षाच्या 200 हून अधिक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा व्यक्त केल्याने त्यांचे पारडे मॉरडाँट यांच्यापेक्षा जड झाले.

सर्व प्रतिस्पर्ध्यांची माघार

सुनक यांच्याशी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत प्रथम माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि हुजूर पक्षाच्या नेत्या पेनी मॉरडाँट हे दोघे होते. मात्र तीन दिवसांपूर्वी जॉन्सन यांनी स्पर्धेतून अंग काढून घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत दोनच प्रतिस्पर्धी उरले. मॉरडाँट यांनी सोमवारी दुपारनंतर माघार घेतली, कारण त्यांना केवळ 26 लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला. अशा परिस्थितीत त्या नियमाप्रमाणे पंतप्रधान होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे सुनक यांना संधी मिळाली.

सुनक सर्वाधिक लोकप्रिय

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात सुनक यांच्याकडे देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले होते. ब्रिटनचे अर्थमंत्री या नात्याने त्यांनी कोरोना उद्रेकाच्या काळात अर्थव्यवस्था सावरण्याचे आणि प्रगतीपथावर नेण्याचे महत्वाचे आणि जटील काम करुन दाखाविले होते. त्यामुळे सर्वसामान्य ब्रिटीश नागरिकांमध्ये सुनक अतिशय लोकप्रिय बनले आहेत.

प्रथम डावलण्यात आले

कोरोना काळात नियमभंग करुन पार्टी केल्याचा आरोपावरुन पूर्वीचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 7 जुलै 2022 या दिवशी राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी सुनक यांनी जॉन्सन यांच्याविरोधात बंड करत मंत्रीपदाचा त्याग करुन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भाग घेतला होता. प्रारंभी ते आघाडीवरही होते. तथापि, लीझ ट्रस यांनी त्यांना जोरदार आव्हान दिल्याने निवड पुढच्या फेरीपर्यंत पोहचली होती. अखेरच्या टप्प्यात पुरेशा प्रतिनिधींचा पाठिंबा मिळविण्यात सुनक मागे पडले. त्यामुळे त्यांचे पंतप्रधानपद त्यावेळी हुकले. पण नव्या पंतप्रधान लीझ ट्रस यांना अर्थव्यवस्था व्यवस्थित न सांभाळता आल्याने जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागले. साहजिकच अवघ्या 45 दिवसांमध्ये ट्रस यांना पदत्याग करावा लागला. त्यानंतर पुन्हा सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले आणि सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवत अंतिम टप्पाही पार केला.

नारायण मूर्ती यांचे सुनक हे जावई

भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील एक इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आणि आधारस्तंभ नारायण मूर्ती यांचे ऋषि सुनक हे जावई आहेत. त्यामुळे त्यांचे त्या दृष्टीने कर्नाटकाशी नाते आहे. नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती या मूळच्या उत्तर कर्नाटकातील आहेत. नारायणमूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे महाराष्ट्राशीही अत्यंत जवळचे संबंध आहेत. पुणे येथे इन्फोसिसचे मोठे केंद्र आहे. अशाप्रकारे सुनक यांचे हे यश भारताबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठीही अत्यानंददायक आहे.

कॅमरॉन यांची भविष्यवाणी साकार

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी 10 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी आता खरी ठरली आहे. भारतीय वंशाचा नेता ब्रिटनचा पंतप्रधान होईल, ही त्यांची भविष्यवाणी होती. ऋषि सुनक यांच्या या पदावरील निवडीमुळे ती साकारली आहे. कॅमरॉन यांनी यासंदर्भात समाधान व्यक्त केले असून सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनक ब्रिटनसाठी लाभदायक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनक यांच्यावर आता जगभरातून अभिनंदनाचा वर्षावर केला जात आहे.

ब्रिटनमध्ये पंतप्रधानची निवड कशी होते…

ड पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून नव्या पंतप्रधानांची होते निवड

ड ज्या इच्छुकांना 100 किंवा अधिक खासदारांचा पाठिंबा ते स्पर्धेत

ड एकाच स्पर्धकाला असा पाठिंबा मिळाल्यास त्याची आपोआप निवड

ड दोन किंवा अधिक स्पर्धकांना असा पाठिंबा मिळाल्यास पुढचा टप्पा

ड पुढच्या टप्प्यात सर्व सत्ताधारी खासदार मतदानाद्वारे करतात निवड

ड याही टप्प्यात निवड अशक्य झाल्यास तिसरा टप्प्याची प्रक्रिया सुरु

ड तिसऱया टप्प्यात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱयांकडून मतदानाने निवड

Related Stories

मालेगावात 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

Tousif Mujawar

लडाख म्हणजे ‘डोकलाम’ नव्हे : चीन

Patil_p

मृतदेहांचे विसर्जन गंगेत नको

Patil_p

बाहुबली आमदार विजय मिश्रा लढविणार निवडणूक

Patil_p

कट्टर शिवसैनिक लढणार! शिवसेनेकडून संजय पवार यांचे नाव निश्चित?

Archana Banage

कॉंग्रेसमधला अंतर्गत कलह विकोपाला; बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेतेपदाचा राजीमाना

Archana Banage