Tarun Bharat

भारतीय सैनिक चुकीने पाकिस्तानात

बीएसएफ-रेंजर्स बैठकीत चर्चा, नंतर घरपरती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक सीमारेषेवरील दाट धुक्यामुळे वाट चुकून पाकिस्तात पोहचल्याची घटना गुरुवारी घडली आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. नंतर सीमा सुरक्षा दल आणि रेंजर्सच्या अधिकाऱयांमध्ये बैठक झाल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तो भारतात परतला आहे.

गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना पंजाबच्या अबोहर सीमारेषेवर घडली. हा सैनिक सीमा सुरक्षा दलाच्या 66 व्या तुकडीचा सदस्य होता. या तुकडीचे काही सदस्य भारताच्या सीमारेषेवरील कुंपणाबाहेरच्या भारताच्या ताब्यातील भागात गस्त घालत होते. त्यावेळी दाट धुके पसरले होते. त्यामुळे त्याला वाट समजली नाही. तो आपल्या सहकाऱयांपासून अलग पडला आणि पाकिस्तानच्या भागात गेला. तेथे त्याला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले.

उपस्थिती नोंद करतेवेळी लक्ष

गस्त आटोपून सैनिक परत आल्यानंतर त्यांची उपस्थिती नोंद करुन गणना करण्यात आली. त्यावेळी एक सैनिक बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्वरित त्याची शोधाशोध सुरु झाली. पाकिस्तानी रेंजर्सशी संपर्क करण्यात आला, तेव्हा तो त्यांच्या ताब्यात असल्याचे समजले. तो पाकिस्तानच्या भागात आल्यामुळे त्याला पकडण्यात आल्याचे रेंजर्सनी स्पष्ट केले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या अधिकाऱयांची बैठक गुरुवारी दुपारी झाली आणि सैनिकाची ओळख पटविण्यात आली. पाककडून त्याची चौकशी तो पर्यंत करण्यात आली होती. त्याच्याकडे काहीही आक्षेपार्ह न सापडल्याने आणि त्याची ओळख भारतीय अधिकाऱयांनी पटवून दिल्याने पाकिस्तान रेंजर्सकडून त्याची सुटका करण्यात आली. दोन्ही बाजूच्या अधिकाऱयांची ही तातडीची ध्वज बैठक होती. दुपारी दीड वाजता त्याला भारतीय अधिकाऱयांच्या आधीन करण्यात आले. त्वरित त्याला भारताच्या भागात आणण्यात आले.

कुंपणापलिकडेही भारताचा भाग

पंजाबच्या पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरुन अंमली पदार्थांची बेकायदा वाहतूक होऊ नये म्हणून सीमेच्या 300 ते 350 मीटर आत भारताचे तारांचे कुंपण उभे केले आहे. 12 फूट उंचीच्या या कुंपणापलिकडेही 300 ते 350 मीटर अंतरापर्यंत भारताचा भाग आहे. तेथर्पंत गस्त घातली जाते. याच भागातून हा सैनिक पाकिस्तानच्या भागात गेल्याचे स्पष्टीकरण नंतर देण्यात आले. थंडीच्या दिवसांमध्ये सीमेवर दाट धुक्यामुळे काहीही दिसेनासे होते. त्यामुळे काहीवेळा आपले सैनिक पाकच्या भागात जाण्याचे प्रकार घडतात असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

बिहार : भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar

Google ने केलं कॉफी एस्प्रेसो मशीन्सच्या जनकाला अभिवादन

Kalyani Amanagi

सलग पाचव्या दिवशी नव्या बाधितांमध्ये घट

Patil_p

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाला प्रारंभ

Patil_p

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल झाले क्वारंटाइन

Tousif Mujawar

ब्रह्मोस सूपरसोनिक मिसाईलची यशस्वी चाचणी

datta jadhav