Tarun Bharat

महिला विश्वचषक हॉकीसाठी भारतीय संघ जाहीर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नेदरलँड्स व स्पेन येथे होणाऱया एफआयएच महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली असून गोलरक्षक सविताकडे या संघाचे नेतृत्व सोपविले आहे तर दुखापतीतून अद्याप सावरली नसल्याने राणी रामपालला या संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Advertisements

1 ते 17 जुलै या कालावधीत ही स्पर्धा होणार असून भारताचा ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, चीन यांच्यासह समावेश आहे. 3 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध भारताची सलामीची लढत होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताला इंग्लंडकडूनच पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे कांस्यपदक हुकले होते. त्याची परतफेड करण्याची संधी भारताला या स्पर्धेत मिळाली आहे. दीप ग्रेस एक्का या संघाची उपकर्णधार असेल.

चार वर्षात एकदा होणाऱया या स्पर्धेच्या आधीच्या लंडनमध्ये झालेल्या आवृत्तीत भारताने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताला आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. आयर्लंडने नंतर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि त्यांना अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भारताचे गट साखळीतील सर्व सामने ऍमस्टलव्हीन येथे खेळविले जातील आणि गटात अव्वल स्थान मिळविल्यास त्यांची उपांत्यपूर्व लढतही ऍमस्टलव्हीन येथेच होईल. उपांत्य व अंतिम सामना मात्र स्पेनमधील तेरासा येथे होतील. गट ब मधील क्रॉसओव्हर सामने स्पेनमध्ये खेळविले जातील.

‘विश्वचषकासाठी आम्ही सर्वोत्तम संघ निवडला असून अनुभवी व युवा खेळाडूंचे त्यात योग्य मिश्रण आहे. राणी रामपाल दुखापतीतून अद्याप पूर्ण बरी झालेली नाही. तिचा अपवाद वगळता ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या संघातील सर्वच खेळाडूंना या संघात सामील करून घेण्यात आले असून ज्योती व सोनिका यांची त्यात भर पडली आहे. संगीता व अक्षता या बदली खेळाडू म्हणून संघासोबत राहणार आहेत,’ असे प्रमुख प्रशिक्षिका जॅनेक स्कॉपमन म्हणाल्या.

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय महिला संघ ः गोलरक्षिका-सविता (कर्णधार), बिछू देवी खरिबम. बचावफळी-दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्कती प्रधान, उदिता. मध्यफळी-निशा, सुशीला चानू पुखराम्बम, मोनिका, नेहा, ज्योती, नवज्योत कौर, सोनिका, सलिमा टेटे. आघाडीफळी-वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी. राखीव ः अक्षता आबासो ढेकळे, संगीता कुमारी.

Related Stories

ऑस्ट्रेलियाच्या मदतीला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर

prashant_c

भारतीय पुरुष, महिला संघाच्या हार्ड क्वारंटाईनला सुरुवात

Patil_p

रशियन पुरूष स्कल्स संघाची ऑलिंपिक स्पर्धेतून माघार

Patil_p

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द

Patil_p

एटीके बागानची विजयी सलामी

Patil_p

फुटबॉलपटू फाँड्रे मुंबई सिटी क्लबशी करारबद्ध

Patil_p
error: Content is protected !!