हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद, अमित रोहिदास उपकर्णधार, 13 जानेवारीपासून स्पर्धेस प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफआयएच पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून डिफेंडर हरमनप्रीत सिंगकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. 13 जानेवारीपासून या स्पर्धेला ओडिशामध्ये सुरुवात होणार आहे.
आणखी एक डिफेंडर अमित रोहिदासकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतही हरमनप्रीत भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताने या मालिकेत शानदार प्रदर्शन केले असले तरी ऑस्ट्रेलियाकडून त्यांना 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले, त्यावेळी मिडफिल्डर मनप्रीत सिंग हा संघाचा कर्णधार होता. पण यावेळी तो संघात खेळाडू म्हणून राहणार आहे. प्रशिक्षक गॅहम रीड कर्णधारपदाची धुरा दरवेळी वेगळय़ा खेळाडूकडे सोपवितात, असे दिसून आले आहे. त्याप्रमाणे यावेळी त्यांनी ही जबाबदारी हरमनप्रीतकडे दिली आहे. वरिष्ठ खेळाडूंतून कर्णधार निर्माण व्हावेत, हा त्यामागे त्यांचा हेतू असून यापूर्वी अमित रोहिदासनेही कर्णधारपद भूषविलेले आहे.
बेंगळूरमधील साई केंदात 33 खेळाडूंची दोन दिवस चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण असून दीर्घकाळापासून हुलकावणी देत असलेले विश्वचषक पदक मिळवून देण्यात ते यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिक हॉकी संघाचे सदस्य असलेले गुर्जंत सिंग व दिलप्रीत सिंग यांना मुख्य संघात स्थान मिळालेले नाही. पण राखीव खेळाडू म्हणून ते संघासोबत राहतील. ‘सध्याचा फॉर्म व त्यांचे प्रदर्शन पाहूनच या संघाची निवड करण्यात आली असून अन्य कोणत्याही निकषावर ही निवड झालेली नाही,’ असे हॉकी इंडियाच्या निवड समिती सदस्याने सांगितले.
कृशन बी. पाठक व पीआर श्रीजेश हे दोघे गोलरक्षक चौथ्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार असून मायभूमीतील ही त्यांची ही तिसरी स्पर्धा आहे. बचावफळीत कर्णधार हरमनप्रीत उपकर्णधार अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जरमनप्रीत सिंग, निलम संजीव झेस यांच्यासह आघाडी सांभाळेल. मध्यफळीत युवा खेळाडू विवेक सागर प्रसादचे पुनरागमन झाले असून ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका व प्रो हॉकी लीगमध्ये त्याला घोटय़ाच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. मध्यफळीत त्याच्यासह मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, निलकांता शर्मा, शमशेर सिंग व अनुभवी आकाशदीप सिंग खेळतील. आघाडीफळीत मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, पदार्पणापासून प्रभावी प्रदर्शन करणारे युवा खेळाडू अभिषेक व सुखजीत सिंग यांचा समावेश आहे. याशिवाय राजकुमार पाल व जुगराज सिंग यांना पर्यायी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
या स्पर्धेची भारताची सलामीची लढत 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध होईल. राऊरकेलातील नव्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर हा सामना होईल. याच ठिकाणी इंग्लंडविरुद्ध दुसरा सामनाही होईल. तिसरा सामना भुवनेश्वरमध्ये वेल्सविरुद्ध होणार आहे. उपांत्यपूर्व सामने 25 जानेवारीस तर उपांत्य सामने 29 जानेवारीस होतील.
भारतीय हॉकी संघ ः गोलरक्षक-कृशन बहादुर पाठक, पीआर श्रीजेश. डिफेंडर्स-जरमनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), निलम संजीव झेस. मिडफिल्डर्स-मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, निलकांता शर्मा, शमशेर सिंग, वेवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग. आघाडी फळी-मनदीप सिंग, ललिक कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग. पर्यायी खेळाडू-राजकुमार पाल व जुगराज सिंग.