Tarun Bharat

भारतीय संघाचे लक्ष विजयी घोडदौडीवर

वृत्तसंस्था/ बॅसेटेरी (सेंट किट्स)

भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर वनडे आणि टी-20 मालिका खेळत आहे. भारताने सुरुवातीची वनडे मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. त्यानंतर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने विजयी सलामी दिली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना सोमवारी येथे खेळविला जाणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहिल. या सामन्याला सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता प्रारंभ होईल.

पाच सामन्यांच्या या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान विंडीजवर मोठा विजय मिळविला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली असली तरी रोहित शर्माचे कुशल नेतृत्व या विजयाला हातभार लावणारे निश्चितच वाटते. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि रवि बिश्नोई या तीन फिरकी गोलंदाजांना संघात संधी दिली होती. सोमवारच्या सामन्यात भारतीय संघ सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत पुन्हा एकदा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. चालू वर्षाअखेरीस आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याने भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीतील सातत्याचा सूर राखणे जरुरीचे आहे. भारतीय संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या टी-20 सामन्यात रोहित शर्मासमवेत सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. तर विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवला सलामीला फलंदाजीसाठी पाठविण्यात आले होते. 2022 च्या क्रिकेट हंगामामध्ये आतापर्यंत झालेल्या टी-20 प्रकारामध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने सलामीसाठी 7 फलंदाजांची चाचणी घेतली आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 24 धावा फटकाविल्या होत्या. भारतीय संघातील सलामीचा नियमित फलंदाज के. एल. राहुल सध्या तरी उपलब्ध नसल्याने भारतीय निवड समिती सलामीच्या गडय़ासाठी विविध प्रयोग करीत आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत भारतीय संघामध्ये डावखुरा दर्जेदार वेगवान गोलंदाज पहावयास मिळालेला नाही. आता नवोदितातून पंजाबचा 23 वर्षीय अर्शदीप सिंग भारतीय संघाला डावखुरा वेगवान गोलंदाज लाभला आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगने बऱयापैकी गोलंदाजी केली असून त्याने विंडीजचा अष्टपैलू अकिल हुसेनला यॉर्करवर त्रिफळाचित केले होते. तसेच त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूवर विंडीजच्या मेयर्सचा बळी मिळविला होता. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने कप्तानी खेळी करताना 44 चेंडूत 64 धावा जमविल्यानंतर भारतीय संघ 170 धावापर्यंत मजल मारेल असे वाटत होते पण अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने समयोचित फटकेबाजी करताना 19 चेंडूत 41 धावा झोडपल्याने भारताला या सामन्यात 190 धावापर्यंत मजल मारता आली. भारताच्या फलंदाजांनी शेवटच्या दोन षटकात 36 धावा झोडपल्या.

रविचंद्रन अश्विन आणि रवि बिश्नोई यांची पहिल्या सामन्यातील कामगिरी निश्चितच समाधानकारक झाली आहे. अश्विनने आपल्या 4 षटकात 22 धावात दोन गडी बाद केले. तर 21 वर्षीय बिश्नोईने आपल्या 4 षटकात 26 धावांच्या मोबदल्यात 2 बळी मिळविले. सोमवारच्या दुसऱया सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन जडेजा, अश्विन, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाला कायम ठेवेल की त्यांच्या जागी अक्षर पटेल, कुलदीप यादव यांना संधी देईल असे वाटते.

भारत संघ- रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांडय़ा, रिषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, अवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल.

विंडीज संघ- निकोलास पूरन (कर्णधार), पॉवेल, ब्रुक्स, ड्रेक्स, हेतमेयर, होल्डर, अकील हुसेन, जोसेफ, किंग, मेयर्स, मॅकॉय, किमो पॉल, शेफर्ड, ओडेन स्मिथ, थॉमस आणि हेडन वॉल्श.

Related Stories

केरळच्या संभाव्य संघात श्रीशांतचा समावेश

Patil_p

यू-19 आशिया चषक आठव्यांदा भारताकडे

Patil_p

पहिल्या कसोटीवर दक्षिण आफ्रिकेची पकड

Patil_p

सिडनी टेनिस स्पर्धेत पाओला बेडोसा विजेती

Patil_p

इंग्लंडच्या विजयात लॅम्ब, स्किव्हेरची चमक

Patil_p

महिला ऍथलीट कृष्णा पुनियाला कोरोनाची बाधा

Patil_p