विंडीजविरुद्ध चौथा टी-20 सामना आज, श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था/ फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा
वेस्ट इंडीज दौऱयातील शेवटच्या दोन टी-20 लढती लागोपाठ येथे होणार असून शनिवारी होणाऱया या मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर सर्वाधिक लक्ष असेल. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जात आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 असे आघाडीवर असून मालिकाविजय याच सामन्यात निश्चित करण्याचा प्रयत्नही भारतीय संघ करेल. अमेरिकेतील भारतीय क्रिकेट शौकिनांसाठी हे दोन सामने पर्वणी ठरणार असून त्यांच्याकडून मोठय़ा प्रतिसादाची अपेक्षा केली जात आहे. भारताची सध्याची संघरचना पाहिल्यास श्रेयस अय्यर या एका खेळाडूवर जास्त फोकस केले जाणार आहे. दीपक हुडाने आतापर्यंत त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले असल्याने टी-20 वर्ल्डकपसाठी अय्यरऐवजी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अय्यरवर या गोष्टीचे जास्त दडपण असेल.
आशिया चषक स्पर्धेत केएल राहुल व विराट कोहली यांचे पुनरागमन निश्चित असून अय्यरकडे आपले पारडे जड करण्यासाठी फार कमी वेळ आहे. या मालिकेतील तीन सामन्यात त्याने 0, 10, 27 अशा धावा जमविल्या आहेत. जलद व उसळते चेंडू टॅकल करताना तो जास्त अडखळत असल्याचे दिसून आले आहे. शॉर्ट बॉल ही त्याची मुख्य समस्या असून तो विश्वचषक स्पर्धेत कसा आणि किती वेगाने खेळू शकेल, असे विचार त्याची फलंदाजी पाहताना येत आहेत. वनडेमध्ये पुरेसा वेळ असल्याने त्याला ही अडचण तितकीशी येत नाही. वनडेतील हे यश त्याला टी-20 मध्ये दाखविता आलेले नाही, त्यामुळे त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
प्रशिक्षक द्रविड यांनी त्याला गेल्या अडीच महिन्यात 9 सामन्यांत खेळण्याची संधी दिली असून त्यापैकी एक सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता आणि उर्वरित सामन्यांत पहिल्या दहा षटकांत खेळण्याची संधी मिळूनही त्याला एकदाही अर्धशतकी मजल मारता आली नाही. त्यामुळे येथील दोन सामन्यात संधी मिळाल्यास त्याच्याकडे सर्वोत्तम कामगिरी करण्याशिवाय पर्याय नसेल. आणि जर आशिया कप किंवा वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली तर अंतिम एकादशमध्ये त्याला स्थान मिळण्याबाबतही साशंकता आहे.
या सामन्यातही कर्णधार रोहित शर्माच्या साथीला सूर्यकुमार यादव सलामीला उतरणार असून रोहित या सामन्यात खेळण्याची अपेक्षा आहे. तिसऱयात सामन्यात पाठदुखीमुळे त्याला फलंदाजी करताना निव़ृत्त व्हावे लागले होते. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली असल्याने तो खेळण्यास उत्सुक असेल. गोलंदाजीत हर्शल पटेल जखमी असल्यामुळे अवेश खान मागील सामन्यात महागडा ठरला असला तरी त्याला पुन्हा एकदा संधी मिळेल. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला या दोन सामन्यात तरी संधी दिली जाते का, हे पहावे लागेल. हर्शल अनफिट ठरल्यास त्याला घेण्याचा विचार होऊ शकतो.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार, अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, जडेजा, अक्षर पटेल, अश्विन, बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, अवेश खान, भुवनेश्वर, हर्शल पटेल.
विंडीज ः निकोलस पूरन (कर्णधार), पॉवेल, बूक्स, ड्रेक्स, हेतमेयर, होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, काईल मेयर्स, मॅकॉय, कीमो पॉल, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, देव्हॉन थॉमस, हेडन वॉल्श.
सामन्याची वेळ ः रात्री 8 पासून.