भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हमनप्रीत सिंगने दिली कबुली : प्रो लीग सामने खेळून संघ मायदेशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई खेळांसह पुढील वाटचालीत येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना भारतीय पुरुष हॉकी संघाला कमी गोल स्वीकारण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल आणि गोल करण्याच्या अधिक संधी निर्माण कराव्या लागतील हे संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने मान्य केले आहे. ‘एफआयएच प्रो लीग’चे युरोपमधील सामने खेळून भारतीय संघ मायदेशी परतला आहे. दोन आठवड्यांचा हा दौरा संमिश्र निकाल देणारा ठरला आहे. आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकण्यात भारताने यश मिळविले.
भारत बेल्जियमविऊद्ध एका सामन्यात 1-2 अशा फरकाने हरला आणि दुसऱ्या सामन्यात 5-1 ने विजय मिळवला, तर ब्रिटनविऊद्ध ते एकदा 2-4 ने हरले आणि एकदा 4-4 (4-2) असा शूटआऊटमध्ये विजय मिळवला. अर्जेंटिनाविऊद्धच्या लढतींत भारताने 3-0 आणि 2-1 ने विजय मिळवले, तर संघाला नेदरलँड्सविरुद्ध 1-4 आणि 2-3 ने पराभव पत्करावे लागले.
युरोपमधील सामन्यांमधून अनेक धडे मिळालेले आहेत. आम्हाला काही गोल खावे लागले आणि त्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात निर्माण केलेल्या संधींचे रूपांतर करण्यावरही काम करायला हवे. आघाडीच्या युरोपियन संघांविरुद्ध खेळणे हा शिकण्यासाठी नेहमीच चांगला अनुभव असतो. आता आम्ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशियाई खेळांमध्ये आघाडीच्या आशियाई संघांविऊद्ध सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रीत करू, असे कर्णधार हरमनप्रीत याने म्हटले आहे.
भारताने 16 प्रो लीग सामन्यांतून 30 गुणांसह गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांची जागा घेतलेले नवीन मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने तेंड दिलेली ही पहिली परीक्षा होती. क्रेग यांनी संघात खूप सकारात्मकता आणली आहे आणि आपण संघ म्हणून कसे खेळले पाहिजे याविषयीचे त्यांचे विचार आणि अपेक्षा अगदी स्पष्ट आहेत. युरोपमधील या सामन्यांमध्ये खेळताना शिस्तबद्ध रचना राबवण्यावर आणि चांगला बचाव करण्यावर भर देण्यात आला होता, असे हरमनप्रीतने सांगितले.
भारतीय हॉकी संघ सध्या विश्रांतीवर असून सराव शिबिर पुन्हा सुरू झाल्यावर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू होईल. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन 3 ते 12 ऑगस्टदरम्यान चेन्नई येथे होणार आहे, तर आशियाई खेळ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील हांगझाऊ येथे होणार आहेत.