विश्वचषकासाठी पात्र : अंतिम लढतीत दक्षिण कोरियाचे आव्हान
वृत्तसंस्था/ काकामिगारा (जपान)
भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. ज्युनिअर एशिया कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान जपानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने जपानचा 1-0 असा पराभव केला. भारतातर्फे सुनिलिता टोप्पोने एकमेव गोल केला. वेशेष म्हणजे, भारतीय महिलांनी ज्युनिअर एशिया कप स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. याआधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. या विजयासह भारतीय संघ यंदाच्या वर्षी होणाऱ्या ज्युनियर महिला हॉकी वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान चिलीमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. भारत व दक्षिण कोरिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. कोरियन संघाने चीनला 2-0 असे नमवत अंतिम फेरी गाठली आहे.
सेमीफायनलमध्ये यजमान जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. जपानने भारतीय संघाच्या खेळाडूंवर सामन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जपानला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले पण भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रामध्ये दोनही संघांनी आपला खेळ आक्रमक केला. गोलच्या दिशेने दोनही संघांच्या खेळाडूंनी अनेक चाली रचल्या. जपान दोन वेळा गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचले. पण भारताची गोलकिपर माधुरी किंडोने दोनही वेळा जबरदस्त बचाव करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
सामन्याच्या तिसऱ्या सत्रात जपानने चेंडू आपल्याकडेच ठेवत भारतीय संघावर दबाव वाढवला. जपानच्या आक्रमणापुढे भारतीय संघ काहीसा बॅकफुटवर गेला. यादरम्यान भारतीय संघाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय संघाला अपयश आले. यामुळे तिसऱ्या सत्रातही गोल झाला नाही. चौथ्या सत्रात मात्र भारताला गोल करण्यात यश आले. 47 व्या मिनिटाला सुनिलिता टोप्पोने शानदार मैदानी गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवत हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.