Tarun Bharat

भारतीय महिलांचा इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिकाविजय!

Advertisements

23 वर्षांनंतर प्रथमच इंग्लिश भूमीत वनडे मालिका जिंकली, सलग दुसऱया वनडेत एकतर्फी विजय, 2-0 फरकाने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब हरमनप्रीतचे तडाखेबंद, नाबाद शतक

कॅन्टरबरी / वृत्तसंस्था

कर्णधार हरमनप्रीत कौरची अवघ्या 111 चेंडूत नाबाद 143 धावांची  आतषबाजी व रेणुका सिंगच्या 57 धावातील 4 बळींच्या बळावर भारतीय महिला संघाने येथील दुसऱया वनडे सामन्यात इंग्लंडचा 88 धावांनी धुव्वा उडवला आणि इंग्लंडविरुद्ध 23 वर्षांनंतर प्रथमच एखादा मालिकाविजय नोंदवला. व्हिन्टेज हरमनप्रीतने 2017 वर्ल्डकपच्या आठवणीला उजाळा देणारे नाबाद शतक झळकावल्यानंतर भारताने निर्धारित 50 षटकात 5 बाद 333 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात इंग्लिश महिला संघाला 44.2 षटकात सर्वबाद 245 धावांवर समाधान मानावे लागले. मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने 57 धावात 4 बळी घेत भेदक मारा साकारला.

इंग्लिश संघातर्फे डॅनी वॅटने 58 चेंडूत 65 धावांचे योगदान दिले. मात्र, इतका अपवाद वगळता यजमान संघातील एकाही फलंदाजाने फारसा प्रतिकार केला नाही. भारतीय महिला संघाने यापूर्वी 1999 मध्ये इंग्लिश भूमीत शेवटची मालिका जिंकली होती.

बुधवारी झालेल्या दुसऱया वनडेत विजयासाठी 334 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ विजयाच्या आसपास देखील फिरकू शकला नाही. रेणुका सिंग ठाकुरने इम्मा लॅम्ब (15) व सोफिया डंकली (1) या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. टॅमी ब्यूमाँट (6) धावचीत झाल्याने इंग्लंडच्या अडचणीत आणखी भर पडली. यामुळे आठव्या षटकात त्यांची 3 बाद 47 अशी स्थिती होती. ऍलाईस कॅप्से (39) व वॅट यांनी चौथ्या गडय़ासाठी 55 धावांची भागीदारी साकारली. नंतर वॅटने कर्णधार ऍमी जोन्स (39) हिच्यासह आणखी 65 धावांची भर घातली. तत्पूर्वी, रेणुकाने 30 व्या षटकात वॅटला बाद करत मोठा अडसर दूर केला. उत्तरार्धात, चार्ली डीन (37) व केट क्रॉस (14) यांनी शक्य तितके प्रयत्न केले. पण, एव्हाना भारताचे वर्चस्व अधोरेखित झाले होते.

हरमनप्रीतचे 18 चौकार, 4 षटकार

प्रारंभी, हरमनप्रीत कौरने 18 चौकार व 4 षटकारांसह नाबाद शतक झळकावले. तिचे हे पाचवे वनडे शतक आहे. यामुळे भारताने 5 बाद 333 धावांचा डोंगर रचला. तिने हरलीन देओलसमवेत (72 चेंडूत 58 धावा) चौथ्या गडय़ासाठी 113 धावांची भागीदारी साकारली. शिवाय, नंतर पूजा वस्त्रकारसमवेत (18) 50 धावा तर दीप्ती शर्मासमवेत सहाव्या गडय़ासाठी केवळ 4 षटकातच 71 धावांची आतषबाजी केली. आश्चर्य म्हणजे यात दीप्तीचा वाटा अवघ्या 15 धावांचा राहिला. दीप्ती याच धावसंख्येवर नाबाद राहिली.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला संघ : 50 षटकात 5 बाद 333 (हरमनप्रीत कौर 111 चेंडूत 18 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 143, हरलीन देओल 72 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 58, स्मृती मानधना 51 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 40, यास्तिका भाटिया 34 चेंडूत 4 चौकारांसह 26, पूजा वस्त्रकार 18, दीप्ती शर्मा नाबाद 15. अवांतर 25. चार्ली डीन 1-39, सोफी इक्लेस्टोन 1-64, केट क्रॉस 1-68, लॉरेन बेल 1-79, प्रेया केम्प 1-82).

इंग्लिश महिला संघ : 44.2 षटकात सर्वबाद 245 (डॅनी वॅट 58 चेंडूत 6 चौकारांसह 65, ऍमी जोन्स 51 चेंडूत 39, ऍलाईस कॅप्से 36 चेंडूत 6 चौकारांसह 39, चार्ली डीन 44 चेंडूत 37. अवांतर 5. रेणुका सिंग ठाकुर 10 षटकात 4-57, दयालन हेमलता 2-6, शफाली, दीप्ती प्रत्येकी 1 बळी).

हरमनप्रीतच्या झंझावातामुळे शेवटच्या 3 षटकात 62 धावांची आतषबाजी

कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावणाऱया हरमनप्रीत कौरने डेथ ओव्हर्समध्ये इतक्या तडफेने फटकेबाजी केली की, प्रतिस्पर्धी इंग्लिश संघाला बचावाचीही संधी मिळाली नाही. काऊ कॉर्नरच्या दिशेने स्लॉग स्वीप असेल किंवा कव्हर रिजनमधील घणाघाती फटके, हरमनप्रीतला रोखणे निव्वळ अशक्यप्राय ठरत गेले. गोलंदाजांना खेळपट्टीकडून अतिशय कमी मदत मिळत असताना चेंडू सहजपणे बॅटवर येत गेला आणि याचा हरमनप्रीतने उत्तम लाभ घेतला. ऑफस्पिनर चार्ली डीन (1-39) हिलाच थोडाफार किफायतशीर मारा करता आला. डावखुरी सीमर प्रेया केम्पला तिच्या 7 व्या षटकात 28 धावा मोजाव्या लागल्या आणि अंतिमतः तिचे पृथक्करण 10 षटकात 82 धावात 1 बळी, असे महागडे ठरले.

जेव्हा सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवणारी दीप्तीही हरमनप्रीतची फटकेबाजी पाहत राहिली!

भारतातर्फे महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 188 धावांचा विक्रम दीप्ती शर्माच्या खात्यावर आहे. मात्र, हरमनप्रीतने सहाव्या गडय़ासाठी दीप्तीसह 4 षटकात 71 धावांची अभेद्य भागीदारी केली, त्यावेळी दीप्तीला नॉन स्ट्राईक एण्डवरच अधिक रहावे लागले. हरमनप्रीतने यावेळी खेळाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लिश महिला गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडले होते!

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणारे भारतीय फलंदाज

  • महिला फलंदाज / धावा / चेंडू / चौकार / षटकार / प्रतिस्पर्धी / तारीख
  • दीप्ती शर्मा / 188 / 160 / 27 / 2 / आयर्लंड / 15 मे 2017
  • हरमनप्रीत कौर / 171 ना. / 115 / 20 / 7 / ऑस्ट्रेलिया / 20 जुलै 2017
  • हरमनप्रीत कौर / 143 ना. / 111 / 18 / 4 / इंग्लंड /21 सप्टेंबर 2022
  • जया शर्मा / 138 ना. / 150 / 15 / 0 / पाकिस्तान / 30 डिसेंबर 2005

आता झुलनच्या कारकिर्दीची विजयी सांगता करण्याचे लक्ष्य

भारतीय महिला संघ उद्या (शनिवार दि. 24) तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीत इंग्लिश महिला संघाविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी 39 वर्षीय झुलन गोस्वामीसाठी हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध ही वनडे मालिका यापूर्वीच 2-0 फरकाने जिंकली असल्याने तिसऱया व शेवटच्या लढतीला औपचारिक महत्त्व असेल. पण, तिसरी लढतही जिंकून झुलनच्या कारकिर्दीची विजयी सांगता करणे, हे आपले लक्ष्य असेल, असे हरमनप्रीतने म्हटले आहे.

‘लॉर्ड्सवरील तिसरा व शेवटचा सामना आमच्यासाठी विशेष स्वरुपाचा असेल. मालिका यापूर्वीच जिंकली असल्याने आमच्यावर दडपण नसेल आणि त्यामुळे त्या लढतीचा आनंद लुटता येईल. झुलन गोस्वामीसारखी वरिष्ठ संघसहकारी या सामन्यानंतर पुन्हा आमच्यासमवेत संघात समाविष्ट नसेल, याची खंत असेल. पण, येथे विजय मिळवून तिच्या कारकिर्दीची यथोचित सांगता करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढू’, असे हरमनप्रीत याप्रसंगी म्हणाली.

Related Stories

अमेरिकेच्या मॅक्लॉलिनचा नवा विश्वविक्रम

Patil_p

युरो फुटबॉल प्लेऑफ लढती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये

Patil_p

सानिया मिर्झा-झेंग यांचे आव्हान समाप्त

Patil_p

स्कॉटलंडचा गिल्मूर कोरोना बाधित

Patil_p

नदालच्या टेनिस सरावाला प्रारंभ

Patil_p

बंगाल, तामिळनाडूची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!