वृत्तसंस्था /पल्लीकेली
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ लंकेच्या दौऱयावर आला आहे. या दौऱयात उभय संघामध्ये तीन सामन्यांची वनडे क्रिकेट मालिका खेळविली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी होत आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र भारतीय संघाला मिथाली राजची उणीव निश्चित भासेल.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मिथाली राज आणि झुलन गोस्वामी हे प्रमुख दोन स्तंभ म्हणून ओळखले जातात पण मिथाली राजने अलिकडेच क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे तसेच दुखापतीमुळे झुलन गोस्वामी या मालिकेसाठी उपलब्ध राहिलेली नाही. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने लंकेच्या दौऱयात यापूर्वी यशस्वी सुरूवात करताना टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. आता वनडे मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाला अधिक दर्जेदार कामगिरी करावी लागेल. लंकन महिला संघाने अलिकडेच टी-20 मालिकेतील शेवटचा सामना जिंकला असल्याने त्यांचा आत्मविश्वास निश्चित वाढला आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या वनडे मालिकेत लंकेला पाककडून पराभूत व्हावे लागले होते. लंकन संघाचे नेतृत्व चमिरा अट्टापटूकडे सोपविण्यात आले आहे. भारतीय संघामध्ये स्मृती मंदाना, शेफाली वर्मा, यष्टीका भाटिया, मेघना, दिप्ती शर्मा, पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहाद्दूर, रिचा घोश, पुजा वस्त्रsकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, तानिया भाटिया आणि देओल यांचा समावेश आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल.