वृत्तसंस्था/ पल्लीकेले
शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या वनडे क्रिकेट सामन्यात ‘सामनावीर’ दीप्ती शर्माच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान लंकेचा 4 गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. तीन सामन्यांची ही वनडे मालिका आयसीसीच्या वनडे चॅम्पियनशिप अंतर्गत खेळविली जात आहे.
या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकन संघाचा डाव 48.2 षटकांत 171 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 38 षटकांत 6 बाद 176 धावा जमवित विजय नोंदविला.
लंकेच्या डावात सलामीच्या हसिनी परेराने 54 चेंडूत 5 चौकारांसह 37, निलाक्षी डिसिल्वाने 63 चेंडूत 4 चौकारांसह 43, हर्शिता समरविक्रमाने 54 चेंडूत 3 चौकारांसह 28, अनुश्का संजीवनीने 18 तर रणवीराने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 15 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे दीप्ती शर्माने 25 धावांत 3, रेणुका सिंगने 29 धावांत 3, पूजा वस्त्रकारने 26 धावांत 2 आणि गायकवाड व हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये शफाली वर्माने 40 चेंडूत 2 षटकार एक चौकारांसह 35, स्मृती मानधनाने एक चौकारांसह 4, भाटियाने 1, कर्णधार हरमनप्रित कौरने 63 चेंडूत 3 चौकारांसह 44, देओलने 40 चेंडूत 2 चौकारांसह 34, दिप्ती शर्माने 41 चेंडूत नाबाद 22 आणि पूजा वस्त्रकारने 19 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 21 धावा जमवित आपल्या संघाला 6 गडय़ांनी विजय मिळवून दिला. भारताच्या डावामध्ये 4 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे रणवीराने 39 धावांत 4 तर राणासिंघेने 34 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
लंका 48.2 षटकांत सर्वबाद 171 (परेरा 37, समरविक्रमा 28, निलाक्षी डिसिल्वा 43, संजीवनी 18, रणवीरा 12, दीप्ती शर्मा 3-25, रेणुका सिंग 3-29, पूजा वस्त्रकार 2-26, गायकवाड 1-33, कौर 1-13), भारत 38 षटकांत 6 बाद 176 (शफाली वर्मा 35, हरमनप्रित कौर 44, देओल 34, दीप्ती शर्मा नाबाद 22, पूजा वस्त्रकार नाबाद 21, रणवीरा 4-39, राणसिंघे 2-34).