वृत्तसंस्था/ ऍम्स्टलव्हीन (हॉलंड)
येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत ब गटातील झालेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताचे आव्हान या पराभवानंतरही कायम आहे.
या स्पर्धेत गुणतक्त्यात ब गटातून न्यूझीलंडने 7 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून इंग्लंड 4 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. भारत आणि चीन यांनी समान 2 गुण मिळविले असले तरी भारतीय महिला संघ सरस गोलसरासरीच्या जोरावर आघाडीवर आहे.
या स्पर्धेच्या फॉर्मेटनुसार चार गटातील आघाडीचे चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी थेट पात्र ठरतील. त्यानंतर दुसऱया आणि तिसऱया स्थानावरील संघांमध्ये क्रॉस सामने खेळविले जातील. क्रॉस सामन्यातील विजयी चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. ब गटातील भारतीय महिला संघाचा क्रॉस सामना आता क गटातील सहयजमान स्पेनबरोबर रविवारी होत आहे. या स्पर्धेत सहयजमान हॉलंड, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात निर्धारित 60 मिनिटांच्या कालावधीत भारताने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. भारतीय संघाला या कालावधीत पंधरा पेनल्टी कॉर्नर्स मिळाले, पण केवळ एका कॉर्नरवर भारताला गोल नोंदविता आला. या सामन्यात भारतातर्फे वंदना कटारियाने चौथ्या मिनिटाला, लालरेमसियामीने 44 व्या मिनिटाला आणि गुरजित कौरने 59 व्या मिनिटाला गोल नोंदविले. न्यूझीलंडतर्फे ऑलिव्हिया मेरीने 12 व्या आणि 54 व्या मिनिटाला असे दोन गोल, तर टेसा जॉफने 29 व्या आणि फ्रान्सिस डेव्हिसने 32 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात 12 व्या मिनिटाला न्यूझीलंडला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि ऑलिव्हिया मेरीने गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. तत्पूर्वी चौथ्या मिनिटाला वंदना कटारियाने भारताचे खाते उघडले होते. टेसा जॉफने 29 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत न्यूझीलंडने भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. 44 व्या मिनिटाला लालरेमसियामीने गोल नोंदवून भारताला पुन्हा बरोबरी साधून दिली. फ्रान्सिस डेव्हिसने 32 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा तिसरा गोल केला. ऑलिव्हिया मेरीने 54 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा चौथा गोल नोंदविला. गुरुजित कौरने सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना गोल नोंदविला. पण न्यूझीलंडने हा सामना 4-3 अशा गोलफरकाने जिंकून भारताचे आव्हान संपुष्टात आणले.