वृत्तसंस्था/ रॉटरडॅम
शनिवारी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या अर्जेंटिनाचा 2-1 अशा गोलफरकाने पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.
शनिवारच्या या सामन्यात भारतीय संघातील गुरजित कौरने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यातील निर्धारित वेळेत दोन्ही संघ 3-3 असे गोल बरोबरीत राहिले होते. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा पंचांनी अवलंब केला. निर्धारित कालावधीत भारताच्या गुरजित कौरने 37 आणि 61 व मिनिटाला असे दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. चौथ्या मिनिटाला भारताचा आणखी एक गोल लालरेमसियामीने केला. अर्जेंटिनाच्या ऑगस्टीना गोर्झेलेनीने 22 व्या, 37 व्या आणि 45 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवित हॅट्ट्रीक साधत निर्धारित वेळेत भारताला 3-3 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे नेहा गोयल आणि सोनिका यांनी तर अर्जेंटिनातर्फे व्हिक्टोरिया ग्रॅनेटोने एकमेव गोल नोंदविला. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून हार पत्करावी लागली होती. या पराभवाची परतफेड भारताने शनिवारच्या सामन्यात केली.