वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षांच्या अखेरीस चीनमधील हांगझोयु येथे होणाऱया आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाचे पदार्पण होणार आहे. आशियाई स्पर्धा आयोजकांनी भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश दिल्याची माहिती सोमवारी अखिल भारतीय सॉफ्टबॉल फेडरेशनने दिली आहे.
23 फेब्रुवारी रोजी झालेल्या आशियाई सॉफ्टबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाला आगामी आशियाई स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली. भारतीय ऑलिंपिक संघटनेने महिला सॉफ्टबॉल संघाला आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सॉफ्टबॉल प्रकाराचा समावेश होता. तसेच 2028 साली होणाऱया लॉस एंजिल्स ऑलिंपिक स्पर्धेत या क्रीडाप्रकाराचा निश्चित समावेश राहील.