Tarun Bharat

भारतीय महिलांचे विश्वचषकातील आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ टेरेसा (स्पेन)

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचे आव्हान समाप्त झाले आहे. सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या क्रॉसओव्हर सामन्यात यजमान स्पेनने भारताचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.

या सामन्यात दोन्ही संघांकडून आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला गेला होता. दोन्ही संघांकडून गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. भारताला या सामन्यात पेनल्टी कॉर्नर्स मिळूनही त्याचा लाभ उठवता आला नाही. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. सामना संपण्यास केवळ 3 मिनिटे बाकी असताना मार्टा सेगुने स्पेनचा निर्णायक गोल करत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यामध्ये भारताला एकूण 4 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते. 8 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण स्पेनच्या भक्कम बचावफळीने भारताला खाते उघडण्यापासून रोखले. सामन्यातील दुसऱया सत्रात भारताच्या तुलनेत स्पेनने अधिक चढाया केल्या. या कालावधीत स्पेनला पाठोपाठ 3 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते. पण भारतीय संघाची कर्णधार सविताने भक्कम गोलरक्षण करत स्पेनला खाते उघडू दिले नाही.

सामन्याच्या उत्तरार्धात भारताने आपल्या डावपेचांमध्ये बदल करत स्पेनच्या बचावफळीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. भारतीय खेळाडूंना या कालावधीत चेंडूवर ताबा राखता न आल्याने त्यांना गोल नोंदविता आला नाही. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत स्पेनच्या जॉर्जिना ओलिव्हाने भारतीय बचावफळीला हुलकावणी देत गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली, पण तिचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने भारतावर हा गोल होऊ शकला नाही. 57 व्या मिनिटाला स्पेनच्या मार्टा सेगुने क्लेराच्या पासवर एकमेव निर्णायक मैदानी गोल केला. या सामन्यात शेवटच्या काही मिनिटांच्या कालावधीत स्पेनच्या गार्सियाला पंचांनी पिवळे कार्ड तसेच सेगुला हिरवे कार्ड दाखविले होते. त्यामुळे स्पेनला 9 खेळाडूंनिशी शेवटच्या दहा मिनिटात खेळावे लागले. आता या स्पर्धेत नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी होणाऱया सामन्यामध्ये भारताची मंगळवारी कॅनडाबरोबर लढत होणार आहे. महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत न्यूझीलंड आणि जर्मनी, सहयजमान नेदरलँड्स आणि बेल्जियम, ऑस्ट्रेलिया व स्पेन, इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.

Related Stories

सात्विक-चिरागचे आव्हान समाप्त

Patil_p

युपी वॉरियर्सच्या उपकर्णधारपदी दीप्ती शर्मा

Patil_p

जर्मनीतील स्पर्धेत हॅलेप पुनरागमन करणार

Patil_p

जेफ थॉमसनच्या तालमीत घडला प्रसिद्ध कृष्णा!

Patil_p

झगडणाऱया केकेआरची आज आरसीबीविरुद्ध लिटमस टेस्ट

Patil_p

मुंबई सिटी- अल जझिरा लढत बरोबरीत

Patil_p