भारतात दहशतवादी घुसवून या देशातील शांतता भंग करण्याचा पाकिस्तानचा खेळ जुनाच आहे. मात्र, अलीकडच्या काळात भारताने ही घुसखोरी रोखण्यात चांगल्यापैकी यश मिळविलेले आहे. तसेच अनेक पाकप्रशिक्षित दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे. त्यामुळे आता हा दहशतवादी घुसवण्याचा खेळ अधिक काळ चालणार नाही, याची पाकिस्तानला जाणीव झाली असून त्याने मानवी दहशतवाद्यांऐवजी ड्रोन दहशतवादाचा आधार घेतला आहे.
परिणामी अलीकडच्या काळात पंजाब, राजस्थान आणि काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात पाकिस्तानची ड्रोन्स अनेकदा दिसून येतात. या ड्रोन्समधून अमलीपदार्थ आणि शस्त्रास्त्रs भारतीय भूमीत टाकली जातात. दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी ड्रोन्सचा आधार अधिकाधिक प्रमाणात पाकिस्तान घेत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने चॅलेंजर नावाचे अँटीड्रोन साधन विकसित केले आहे.
या अँटीड्रोनला चॅलेंजर असेच नाव देण्यात आले आहे. स्वदेशी कंपनी होल्ड डिफेन्स आणि एअरोस्पेस यांनी संयुक्तपणे या अँटीड्रोनची निर्मिती केलेली आहे. या साधनाचे वैशिष्टय़ असे आहे, की शत्रूची सर्व ड्रोन्स त्याच्या माध्यमातून पाडता येतात. शत्रूचे ड्रोन भारतीय वायुक्षेत्रात येताच या अँटीड्रोनला त्याचा सुगावा लागतो आणि त्वरित हे घुसखोर ड्रोन पाडले जाते. या चॅलेंजरची किंमत 60 लाख रुपये असून ते दोन किलोमीटर दूरपर्यंत उडू शकते. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या अँटीड्रोनचे प्रदर्शन करण्यात आले. त्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले आणि त्यामुळे भारताची एक मोठी समस्या दूर होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. या अँटीड्रोन निर्मितीतून ‘मेक इन इंडिया’ योजनेलाही अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. या अँटीड्रोनचे जवळपास सर्व तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संकल्पनेवर या अँटीड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे.