वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी या क्रीडाप्रकारात बरीच वर्षे ऑस्ट्रेलियाने मक्तेदारी राखली आहे. मात्र, 2022 च्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघ प्रयत्नशील राहील.
राष्ट्रकुल स्पर्धा ही प्रत्येक चार वर्षांनी भरविली जाते. या स्पर्धेच्या चोवीस वर्षांच्या इतिहासामध्ये जगातील पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियन पुरुष संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा पुरुष हॉकीची सुवर्णपदके मिळविली आहेत. ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाची ही मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला दर्जेदार खेळ करावा लागेल. गेल्या वषी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पुरुष हॉकीमध्ये ऐतिहासिक कास्यपदक तब्बल 41 वर्षांनंतर मिळविले होते. भारतीय हॉकीचा दर्जा अलीकडच्या कालावधीत बराच सुधारल्याचे जाणवते. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहॅम रिड प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत.
या इतिहासामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने 2010 साली नवी दिल्लीत तसेच 2014 साली ग्लॅसगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. 1998 च्या कौलालंपूर तसेच 2018 च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय हॉकी संघ पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अलीकडच्या कालावधीत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीत सातत्य दिसून येते. त्याचप्रमाणे भारतीय हॉकीपटूंच्या तंदुरुस्तीमध्येही कमालीची सुधारणा झाल्याचे जाणवते. 2022 च्या प्रो-लिग हॉकी स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत बेल्जियम पहिल्या तर हॉलंड दुसऱया स्थानावर राहिला होता.
बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघासमोर बलाढय़ ऑस्टेलियाप्रमाणेच न्यूझीलंड, इंग्लंड, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाक आणि कॅनडा या संघांचेही कडवे आव्हान राहील. या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारत, इंग्लंड, कॅनडा, वेल्स व घाना तसेच अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाक आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय पुरुष हॉकी संघाचा सराव सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ निश्चित दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांनी व्यक्त केला आहे. भारतीय संघामध्ये जागतिक दर्जाचा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचा समावेश आहे. बलाढय़ ऑस्ट्रेलियन संघाला यावेळी पराभूत करण्याची क्षमता भारतीय संघामध्ये निश्चितच असल्याचे मत माजी कर्णधार सरदार सिंगने व्यक्त केले आहे.
बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघालाही पदक मिळविण्याची नामी संधी आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने चौथे स्थान मिळविले होते. तसेच 2022 च्या महिलांच्या प्रो-लिग हॉकी स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळविले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारतीय महिला हॉकी संघाने 2002 साली सुवर्णपदक तर त्यानंतर 2006 च्या मेलबर्न येथील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. 1998 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा अ गटात समावेश असून या गटामध्ये इंग्लंड, कॅनडा, वेल्स, घाना तर ब गटामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, स्कॉडलंड आणि केनिया यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत 4 सुवर्णपदके, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळविले आहे.