Tarun Bharat

भारताचा द.आफ्रिकेवर पहिला मालिकाविजय

Advertisements

दुसरी टी-20 ः सूर्यकुमार, केएल राहुलची तडाखेबंद अर्धशतके, मिलरचे झुंजार शतक वाया

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

दुसऱया टी-20 सामन्यात द.आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर व क्विन्टॉन डी कॉक यांनी झुंजार फलंदाजी करीत विजयासाठी कौतुकास्पद प्रयत्न केले. पण अखेर त्यांचे प्रयत्न अपुरे पडल्यानंतर भारताने 16 धावांनी विजय मिळवित द.आफ्रिकेवर मायदेशातील पहिल्या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केला. मिलरने तडाखेबंद नाबाद शतक झळकावताना 47 चेंडूत नाबाद 106 धावा फटकावल्या. त्यात 8 चौकार, 7 षटकारांचा समावेश होता. त्याचा सहकारी डी कॉकने 48 चेंडूत नाबाद 69 धावा फटकावल्या.

आघाडीच्या चार फलंदाजांनी पुन्हा एकदा पेलेल्या शानदार प्रदर्शनामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱया टी-20 सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 237 धावांचा डोंगर उभा केला. सूर्यकुमार यादव व केएल राहुल यांनी अर्धशतके नोंदवली तर कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर 2 बाद 1 अशा नाजूक स्थितीनंतर डी कॉक व मॅरक्रम यांनी थोडाफार डाव सावरल्यानंतर मिलरने डी कॉकसमवेत केवळ 82 चेंडूत अभेद्य 174 धावांची भागीदारी करीत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना 20 षटकांत 3 बाद 221 धावांपर्यंतच मजल मारता आली.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारतीय फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना 25 चौकार व 13 षटकार ठोकले. एकूण धावसंख्येपैकी 178 धावा त्यांनी चौकार-षटकारांनीच जमविल्या. रोहित शर्मा (37 चेंडूत 43), केएल राहुल (28 चेंडूत 57) यांनी प्रारंभापासूनच आतषबाजी सुरू केल्यानंतर सूर्यकुमार यादव (22 चेंडूत 61) व विराट कोहली (28 चेंडूत नाबाद 49) यांनी संघाला सव्वादोनशेपारचा टप्पा गाठून दिला.

टीकेला सामोरे जावे लागत असलेल्या राहुलने आक्रमक खेळ करीत केवळ 24 चेंडूत अर्धशतकी मजल मारताना रोहित शर्मासमवेत 59 चेंडूत 96 धावांची तडाखेबंद सलामी दिली. तो बाद झाल्यानंतर सूर्याची बॅट पुन्हा एकदा तळपली आणि सलग तिसरे अर्धशतक केवळ 18 चेंडूत तडकावले. भारताने 18 व्या षटकातच 200 धावांचा टप्पा गाठला. या चौघांच्या फटकेबाजीनंतर फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱया दिनेश कार्तिकनेही हात साफ करताना त्याला मिळालेल्या 7 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 17 धावा झोडपल्या. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजी फारशी प्रभावी झाली नाही आणि त्यांनी फुल लेंग्थ गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर फायदा उठवला. पॉवरप्लेमध्ये भारताने बिनबाद 57 धावा फटकावल्या होत्या. फक्त केशव महाराजने किफायशीर मारा करीत 23 धावांत 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 3 बाद 237 ः केएल राहुल 57 (28 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), रोहित 43 (37 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), कोहली नाबाद 49 (28 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार यादव 61 (22 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), दिनेश कार्तिक नाबाद 17 (7 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), अवांतर 10. गोलंदाजी ः केशव महाराज 2-23.

द.आफ्रिका ः 20 षटकांत 3 बाद 221 ः बवुमा व रॉस्यू 0, मॅरक्रम 19 चेंडूत 33, डी कॉक नाबाद 69 (48 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), मिलर नाबाद 106 (47 चेंडूत 8 चौकार, 7 षटकार), अवांतर 13. गोलंदाजी ः अर्शदीप सिंग 2-62, अक्षर पटेल 1-53.

सापाचे मैदानात आगमन

या सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची अपेक्षा केली जात होती. पण एका अनपेक्षित प्राण्याने मैदानावर आक्रमण केल्याचे दिसून आले. सातव्या षटकावेळी एक साप मैदानात आल्याचे दिसून आल्यानंतर काही वेळ खेळ थांबविण्यात आला. द.आफ्रिकन खेळाडूंनी केएल राहुल व पंचांना ते दर्शविले. त्यानंतर मैदानाचे कर्मचारी आवश्यक साहित्यासह धावत मैदानात आले आणि ही समस्या लगेचच दूर केली. दोन मिनिटानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. या ब्रेकचा लाभ घेत खेळाडूंनी ड्रिंक्स इंटरवल घेतला.

वनडे संघात मुकेश कुमार, पाटीदारची निवड, धवनकडे नेतृत्व

नवी दिल्ली ः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून शिखर धवनकडे त्याचे नेतृत्व देण्यात आले आहे. या संघात बंगालचा सीमर मुकेश कुमार व फॉर्ममध्ये असलेला रजत पाटीदार यांना प्रथमच स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड अ विरुद्ध मुकेश कुमारने 3 सामन्यात 9 बळी मिळविले तर बंगाल रणजी संघासाठी या मोसमात त्याने 20 बळी टिपले आहेत.

भारतीय वनडे संघ ः शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, अवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

Related Stories

स्पेनचा दणदणीत विजय, स्वीडनची पोलंडवर मात

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा वेळापत्रकात बदल नाही

Patil_p

इलाक्किया दासन, श्रावणी नंदा जलद धावपटू

Amit Kulkarni

अरुंधती चौधरी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय हॉकी संघांचा सहभाग अनिश्चित

Patil_p

निपाणी भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य

Patil_p
error: Content is protected !!