ऑनलाईन टीम / तरुण भारत :
India’s first voter Shyam Negi passed away स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचे वय 106 वर्ष होते. नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरूवात झाली होती. 2 नोव्हेंबरलाच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचं मतदान केलं होतं.
श्याम नेगी हे हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील ते रहिवाशी होते. त्यांनी आत्तापर्यंत 33 वेळा मतदान केलं असून, बॅलेट पेपर ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी अनुभवला आहे. नेगी यांनी 2 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतदान केलं होतं. या मतदानासाठीचा 12-डी फॉर्म परत केल्यामुळं ते चर्चेत आले होते. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याचदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यांनी त्यांनी पोस्टल मतदान केलं होतं.
अधिक वाचा : पुण्यात 4 डिसेंबरला ‘नाईट मॅरेथॉन’चा थरार
1 जुलै 1917 रोजी नेगी यांचा जन्म झाला. ते एक निवृत्त शिक्षक होते. स्वातंत्र्यानंतर देशात लोकसभेसाठी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान झाले. त्यावेळी हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यातील एका शाळेतल्या मतदान केंद्रात जाऊन नेगी यांनी पहिला मतदानाचा हक्क बजावला होता. देशाचा पहिला मतदार म्हणून त्यांची नोंद झाली आणि इतिहासाने त्याची दखल घेतली.