Tarun Bharat

जपानविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्याचे भारताचे इरादे

इंडोनेशियाविरुद्ध दमदार कामगिरीच्या पुनरावृत्तीचे लक्ष्य

जकार्ता / वृत्तसंस्था

आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिल्या सुपर-4 लढतीत भारतीय हॉकी संघ जपानविरुद्ध मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विशेष प्रयत्नशील असेल. भारताने यापूर्वी दुबळय़ा इंडोनेशियाचा 16-0 असा एकतर्फी फडशा पाडला होता. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती आज अपेक्षित असणार आहे. सुपर-4 फेरीतील अन्य लढतीत दक्षिण कोरियाचा संघ मलेशियाविरुद्ध आव्हान उभे करत आहे.

मागील लढतीतील प्रतिस्पर्धी इंडोनेशियाचा क्रमवारीत बराच तळाच्या लाईनअपमध्ये समावेश होतो. मात्र, तरीही सरदार सिंगच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने अवघ्या तासाभरात 16 गोल करत धमाका केला. भारताच्या त्या दमदार कामगिरीच्या बळामुळेच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

साखळी फेरीअखेर भारत व पाकिस्तान यांच्या खात्यावर प्रत्येकी 4 गुण नोंद झाले. जपानचा संघ गटात सरस ठरला. पण, पाकिस्तानशी बरोबरी झाली असली तरी सरस गोलसरासरीमुळे भारताला बाद फेरीत आगेकूच करता आली. भारताने साखळी फेरीअखेर +1 अशी गोलसरासरी नोंदवली.

वास्तविक, पहिल्या 2 साखळी सामन्यात भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नव्हती. यजमान या नात्याने पुढील वर्षातील विश्वचषक स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवलेल्या भारताने येथे 12 पदार्पणवीर उतरवत अननुभवी संघ निवडला होता. नवख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

युवा खेळाडूंच्या या भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध 1-1 अशा बरोबरीनंतर जपानविरुद्ध 2-5 अशा पराभवाला सामोरे जावे लागले आणि यामुळे एकवेळ त्यांच्यासमोर आव्हान संपुष्टात येण्याचे संकट उभे ठाकले होते. मात्र, इंडोनेशियाचा 16-0 असा धुव्वा उडवल्यानंतर आशाअपेक्षा निर्माण झाल्या आणि जपानने शेवटच्या साखळी फेरीत पाकिस्तानचा 3-2 असा पराभव केल्यानंतर भारताच्या बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

सुपर-4 फेरीत भारतासह जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया या संघांनीही पात्रता मिळवली असून फायनलमधील स्थान सर्वप्रथम निश्चित करण्याचा या संघांचा प्रयत्न असणार आहे. जपानविरुद्ध साखळी फेरीत पराभव पत्करावा लागला होता, त्याचे उट्टे येथे काढण्यासाठी भारतीय संघाने सर्वस्व पणाला लावणे अपेक्षित आहे. काऊंटर खेळ ही जपानची मजबुती असून या बळावरच ते प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणण्यासाठी ओळखले जातात. आज भारताविरुद्ध महत्त्वाच्या लढतीत त्यांचा हाच प्रयत्न असणार आहे.  

पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यातील अपयश ही भारताची मुख्य चिंता

रुपिंदर पाल सिंग किंवा अमित रोहिदास यांच्यासारखे अव्वल दर्जाचे ड्रग फ्लिकर उपलब्ध नसल्याने भारताला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश येत असून हीच संघाची मुख्य चिंता ठरत आली आहे. भारताला  इंडोनशियासारख्या दुबळय़ा संघाविरुद्ध 20 पेक्षा अधिक शॉर्ट कॉर्नर्स मिळाले. पण, यातही ते निम्म्यापेक्षा अधिक देखील संधीचे गोलमध्ये रुपांतर करु शकले नव्हते.

लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय बचावफळीला आज जपानच्या वेगवान खेळाला लगाम घालण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. याशिवाय, मध्यफळीत गोल नोंदवण्याच्या अधिक संधी निर्माण करण्यावर भर द्यावा लागेल. युवा हॉकीपटू उत्तम सिंगला बिनचूक फिनिशिंगवर भर देणे आवश्यक असून पवन राजभरने कामगिरीत सातत्य राखणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

अनुभवी एसव्ही सुनीलने इंडोनेशियाविरुद्ध 2 गोल जरुर केले. पण, त्याचा नेहमीचा वेगवान खेळ दिसून आलेला नाही. अर्थात, या प्रतिकूल स्थितीतही भारताने जपानला जेरीस आणण्याचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर सांघिक खेळावर भर देणे आवश्यक असणार आहे.

Related Stories

आयसीसी कसोटी मानांकनात भारत पुन्हा अव्वल

Amit Kulkarni

स्टोईनिस, वॉर्नर तिसऱया सामन्यातून बाहेर

Patil_p

सराव सामन्यात बुमराहचे दमदार अर्धशतक

Patil_p

न्यूझीलंडचा हॉलंडवर सलग दुसरा विजय

Patil_p

हॅट्ट्रिक पराभवातून सावरण्याचे केकेआरसमोर आव्हान

Patil_p

फॉर्ममधील मुंबईचा आज बांबोळीत ओडिशाशी सामना

Patil_p