वृत्तसंस्था/ दुबई
सोमवारी आयसीसीकडून टी-20 ची ताजी मानांकन यादी घोषित केली. या यादीमध्ये भारताने 268 गुणांसह आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. भारताने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकल्याने त्यांना आणखी एक मानांकन गुण मिळाला. या ताज्या मानांकन यादीत भारत आणि दुसऱया स्थानावरील इंग्लंड यांच्यात आता 7 गुणांचा फरक आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या या मालिकेत यजमान भारताला पहिला सामना गमवावा लागला होता. त्यानंतर नागपूर आणि हैदराबाद येथील दोन्ही सामने जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाचे या मालिकेतील आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. टी-20 ताज्या मानांकन यादीत इंग्लंडचा संघ 261 गुणांनी दुसऱया स्थानावर आहे. सध्या इंग्लंड आणि पाक यांच्यात सात सामन्यांची टी-20 मालिका सुरू असून चौथ्या सामन्याअखेर ती 2-2 अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 258 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. आता दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेत भारताने विजेतेपद मिळविले तर त्यांचे या मानांकनातील अग्रस्थान अधिक भक्कम होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना बुधवारी थिरुवअनंतपूरम येथे खेळविला जाईल.
सध्या पाक आणि द. आफ्रिका यांनी ताज्या मानांकन यादीत संयुक्त तिसरे स्थान मिळविताना समान 258 मानांकन गुण मिळविले आहेत. पाकने टी-20 मालिकेतील उर्वरित तीन सामने जिंकले तर त्यांना दुसऱया स्थानावर झेप घेता येईल. टी-20 च्या ताज्या मानांकन यादीत विद्यमान विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. भारताविरुद्धची मालिका गमावल्याने त्यांचा एक गुण कमी झाला आहे. आता ते 250 मानांकन गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे सहा टी-20 सरावाचे सामने विंडीज, इंग्लंड आणि भारताबरोबर होणार आहेत. या सराव सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियन संघ आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेला प्रारंभ करेल. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेचे जेतेपद पुन्हा आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.