सुलतान जोहोर चषक कनिष्ठ हॉकी स्पर्धा
वृत्तसंस्था/ जोहोर, मलेशिया
येथे सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक कनिष्ठांच्या हॉकी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ संघाने जपानचा 5-1 असा एकतर्फी धुव्वा उडवित तीन सामन्यातील दुसरा विजय मिळविला.
कर्णधार उत्तम सिंग (तिसरे मिनिट), रोहित (12), जॉन्सन पूर्ती (21), बॉबी सिंग धामी (31) व अमनदीप लाक्रा (51) यांनी भारताचे गोल नोंदवले. जपानचा एकमेव गोल 15 व्या मिनिटाला इकुमी साएकीने नोंदवला. उशिराने सुरू झालेल्या या सामन्यात भारताने प्रारंभापासूनच आक्रमण सुरू केले आणि तिसऱयाच मिनिटाला कर्णधार उत्तम सिंगने भारताला पहिले यश मिळवून दिले. जपाननेही आक्रमण करीत भारतीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण भारतीय बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. 12 व्या मिनिटाला रोहितने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताची आघाडी 2-0 अशी केली. मात्र पहिले सत्र संपण्याच्या सुमारास इकुमी साएकीने जपानचा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवून भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली.
दुसऱया सत्रात पहिल्या काही मिनिटांत दोन्ही संघांनी एकमेकांवर जोरदार आक्रमणे केली. पण यश मिळाले ते भारताला. 21 व्या मिनिटाला जॉन्सन पूर्तीने सर्कलमधून जोरदार फटका मारत संघाचा तिसरा गोल केला. यानंतरही भारताने दडपण कायम ठेवत आणखी दोन गोल नोंदवले. मध्यंतरानंतर लगेचच बॉबी सिंगने भारताचा चौथा आणि 51 व्या मिनिटाला अमनदीपने पेनल्टी कॉर्नरवर पाचवा गोल नोंदवत जपानवर एकतर्फी विजय साकार केला. भारताचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.