आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा 3 ऑगस्टपासून
वृत्तसंस्था/ चेन्नई
आशियाई हॉकी फेडरेशनने 2023 च्या चेन्नईत होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेतील कोरिया आणि जपान यांच्यात सलामीची लढत होणार आहे. तर यजमान भारताचा सलामीचा सामना चीनबरोबर 3 ऑगस्टला होईल. सदर स्पर्धा चेन्नईच्या मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धा 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार असून या स्पर्धेत यजमान भारत, कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि चीन असे सहा संघ सहभागी होत आहेत. सहभागी होणार हे सहाही संघ एकाच गटात असून सदर स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असून गुणतक्त्यात प्रत्येक संघाचे स्थान निश्चित होईल. दक्षिण कोरिया हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. दक्षिण कोरियाच्या हॉकी संघाने 2021 साली ही स्पर्धा जिंकली होती. भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत तीनवेळा (2011, 2016, 2018) साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचप्रमाणे पाक हॉकी संघाने 2012, 2013 आणि 2018 साली या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. 2018 साली भारत आणि पाक यांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले. 2023 ची आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हिरो उद्योग समुहाने पुरस्कृत केली असून या स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित असल्याबद्दल हॉकी इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री दिलीप तिर्की यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चेन्नईत होणारी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी हॉकी इंडियाने आतापासूनच पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. आशिया खंडातील हॉकी शौकिनांना ही स्पर्धा म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. चेन्नईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धा भरवली जात असल्याने तामिळनाडूच्या हॉकी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या स्पर्धेसाठी चेन्नईतील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम सर्व सुविधानिशी सुसज्ज करण्याचे काम तामिळनाडू हॉकी संघटनेने हाती घेतले आहे. या स्पर्धेला देशातील हॉकी शौकिनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी व्यक्त केले आहे.