गिल, पुजारा यांची दमदार शतके, बांगलादेशला 513 धावांचे कठीण आव्हान
वृत्तसंस्था/ चेतोग्राम
येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर भारताने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. यजमान बांगलादेशला भारताने विजयासाठी 513 धावांचे कठीण आव्हान दिले असून बांगलादेशने दुसऱया डावात दिवसअखेर बिनबाद 42 धावा जमविल्या. भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. गिलने कसोटीतील आपले पहिले शतक तर चेतेश्वर पुजाराने 19 वे शतक झळकविले. बांगलादेशच्या पहिल्या डावात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 40 धावात 5 गडी बाद केले.
या कसोटीत भारताने पहिल्या डावात 404 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव गडगडला. बांगलादेशने 8 बाद 133 या धावसंख्येवरुन शुक्रवारी तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 2 गडी 17 धावांची भर घालत तंबूत परतले. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. भारताने बांगलादेशवर पहिल्या डावात 254 धावांची भक्कम आघाडी मिळविली. कुलदीप यादवने इबादत हुसेनला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 17 धावा जमविल्या. मेहदी हसन मिराज हा शेवटच्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. अक्षर पटेलने त्याला पंतकरवी यष्टीचीत केले. मेहदी हसनने 82 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. कुलदीप यादवचा इबादत हुसेन हा पाचवा बळी ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये यादवची हि सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 40 धावात 5 गडी बाद केले. मोहम्मद सिराजने 20 धावात 3 तर उमेश यादव व अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. भारताने उपलब्ध असूनही बांगलादेशला फॉलोऑन देण्याचे टाळले.
254 धावांची आघाडी घेतलेल्या भारताने आपल्या दुसऱया डावाला दमदार सुरुवात केली. कर्णधार राहुल आणि गिल यांनी सलामीच्या गडय़ासाठी 22.4 षटकात 70 धावांची भागिदारी केली. भारताच्या दुसऱया डावातील 23 व्या षटकात खलिद अहमदने कर्णधार के. एल. राहुलला तैजुल इस्लामकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 62 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. मात्र पुजाराने सुरुवातीला सावध फलंदाजी करण्यावर भर दिला. त्याचे पहिल्या डावातील शतक 10 धावांनी हुकले होते. पण गिलची फटकेबाजी पाहून पुजारानेही आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 113 धावांची भागिदारी केली. गिलची फलंदाजी चांगलीच बहरली होती. त्याने 152 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 110 धावा झळकाविल्या. गिलचे कसोटीतील हे पहिले शतक आहे. डावातील 50 व्या षटकात मेहदी हसन मिराजने गिलला बदली खेळाडू मेहमुदुल हसनकरवी झेलबाद केले. त्याने 130 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 102 धावा जमविल्या. विराट कोहली 19 धावांवर नाबाद राहिला. पुजाराचे शतक पूर्ण झाल्यानंतर कर्णधार राहुलने डावाची घोषणा केली. पुजाराचे तब्बल 4 वर्षानंतरचे हे कसोटीतील पहिले शतक आहे. भारताच्या दुसऱया डावात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन याला पाठ दुखापतीचा त्रास सुरु झाल्याने तो मैदानात खेळू शकला नाही. भारतीय फलंदाजाने बांगलादेशच्या या बोथट गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उठविला. गिल विरोधात बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांनी दोनवेळा पायचीतचे जोरदार अपिल केले आणि पंचांनी त्याला बादही ठरवले होते. पण डीआरएस रिव्हय़ूनंतर गिल नाबाद असल्याचे घोषित केले. चेतेश्वर पुजारा हा नेहमीच कसोटी सामन्यात खेळपट्टीवर अधिक वेळ राहण्याचा प्रयत्न करीत असतो. पहिल्या डावात त्याने 90 धावा जमविल्या होत्या पण दुसऱया डावात त्याने आक्रमक फटकेबाजी केली. पुजाराने पहिले अर्धशतक 87 चेंडूत तर दुसरे अर्धशतक केवळ 43 चेंडूत पूर्ण केले. भारताने 61.4 षटकात 2 बाद 258 धावांवर डावाची घोषणा करत बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे कठीण आव्हान दिले. बांगलादेशतर्फे खलिद अहमद आणि मेहदी हसन यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे 2 दिवस बाकी असून बांगलादेश संघावर पराभवाचे सावट दिसत आहे.
बांगलादेशने आपल्या दुसऱया डावाला सावध सुरुवात केली. तिसऱया दिवसाअखेर बांगलादेशने 12 षटकात बिनबाद 42 धावा जमविल्या. नजमूल हुसेन शांतो 42 चेंडूत 3 चौकारांसह 25 तर झकीर हसन 3 चौकारांसह 17 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशच्या दुसऱया डावात कर्णधार राहुलने सलामीची जोडी फोडण्यासाठी 6 गोलंदाजांचा वापर केला. पण त्याला यश मिळाले नाही. बांगलादेशला आता उर्वरित 2 दिवसांमध्ये 180 षटकात विजयासाठी 471 धावांची गरज आहे. अक्षर पटेल, अश्विन आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजीची सत्त्वपरीक्षा लागेल.
संक्षिप्त धावफलक – भारत प. डाव ः सर्वबाद 404, बांगलादेश प. डाव ः 55.5 षटकात सर्वबाद 150 (मुशफिकुर रहिम 28, लिटॉन दास 24, झकिर हसन 20, नुरुल हसन 16, मेहदी हसन मिराझ 25, इबादत हुसेन 17, कुलदीप यादव 5-40, मोहम्मद शिराज 3-20, उमेश यादव 1-33, अक्षर पटेल 1-10), भारत दु. डाव ः 61.4 षटकात 2 बाद 258 डाव घोषित (के.एल. राहुल 23, शुबमन गिल 110, चेतेश्वर पुजारा नाबाद 102, कोहली नाबाद 19, खलिद अहमद 1-51, मेहदी हसन मिराझ 1-82), बांगलादेश दु. डाव ः 12 षटकात बिनबाद 42 (नजमुल हुसेन शांतो खेळत आहे 25, झकिर हसन खेळत आहे 17).