स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर यांची शानदार अर्धशतके, दीप्तीचे 2 बळी
वृत्तसंस्था/ होव्ह, इंग्लंड
अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आपल्या शेवटच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली असली तरी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या झुंजार फलंदाजीमुळे महिलांच्या पहिल्या वनडे सामन्यात यजमानांनी 50 षटकांत 7 बाद 227 धावा जमविल्या. 39 वर्षीय झुलन गोस्वामीने 10 षटकांत केवळ 20 धावा देत एक बळी मिळविला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरविताना इंग्लंडची स्थिती लवकरच 6 बाद 128 अशी केली. पण 7, 8 व नवव्या क्रमांकावरील फलंदाजांनी झुंज देत संघाला सव्वादोनशेची मजल मारून देत भारतापुढे बऱयापैकी आव्हान उभे केले. झुलनने किफायतशीर मारा करीत 10 षटकांत 20 धावा देताना 42 निर्धाव चेंडू टाकले. विशेष म्हणजे तिने एकही चौकार किंवा षटकार दिला नाही. तिने एका अप्रतिम ऑफकटरवर टॅमी ब्युमाँटला (7) पायचीत केले.
सीमर मेघना सिंगने एम्मा लँबला (12) बाद केल्यानंतर गोस्वामी व स्पिनर्स दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड यांनी सातत्याने अचूक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. मात्र स्नेह राणा (6 षटकांत 45 धावा), पूजा वस्त्रकार (2 षटकांत 20) व मेघना यांच्यावर त्यांनी आक्रमण करीत भरपूर धावा वसूल केल्याने इंग्लंडला 220 च्या पुढे मजल मारता आली. डॅनी वॅट (50 चेंडूत 43), ऍलाईस डेव्हिडसन रिचर्ड्स (61 चेंडूत नाबाद 50) व सोफी इक्लेस्टोन (33 चेंडूत 31) यांनी उपयुक्त योगदान दिले तर चार्ली डीनने फटकेबाजी करीत 21 चेंडूत नाबाद 24 धावा फटकावत हातभार लावला.
हरमनप्रीत काहीशी निराश झाली असण्याची शक्यता आहे. कारण 34 व्या षटकांत इंग्लंडची स्थिती 6 बाद 128 अशी करीत चांगली पकड मिळली होती. पण त्यांचा डाव झटपट गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. सातव्या, आठव्या व नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात शंभरहून अधिक धावांची भर घातली, ज्या शेवटी निर्णायक ठरू शकतात. गायकवाड व दीप्ती यांनी आपल्या वेगात सतत बदल करीत धावा रोखण्यात यश मिळविले तर स्नेह राणाने एकाच स्पीडमध्ये मारा करण्याची चूक केल्याने फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपे गेले. डेव्हिडसन रिचर्ड्स व इक्लेस्टोन यांनी सातव्या गडय़ासाठी 50 धावांची भर घातली तर डेव्हिडसन रिचर्ड्सने आठव्या गडय़ासाठी डीनसमवेत 49 धावांची उपयुक्त अभेद्य भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड महिला संघ 50 षटकांत 7 बाद 227 ः लँब 12, ब्युमाँट 7, सोफी डंकली 29 (52 चेंडूत 3 चौकार), ऍलिस कॅप्से 19 (28 चेंडूत 3 चौकार), डॅनी वॅट 43 (50 चेंडूत 3 चौकार), ऍमी जोन्स 3, डेव्हिडसन रिचर्ड्स नाबाद 50 (61 चेंडूत 4 चौकार), इक्लेस्टोन 31 (33 चेंडूत 4 चौकार), चार्ली डीन नाबाद 24 (21 चेंडूत 2 चौकार), अवांतर 9. गोलंदाजी ः झुलन गोस्वामी 1-20, मेघना सिंग 1-42, गायकवाड 1-40, पूजा वस्त्रकार 0-20 (2 षटके), स्नेह राणा 1-45 (6 षटके), दीप्ती शर्मा 2-33, हरलीन देओल 1-25 (4 षटके).