वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात ‘व्यापक आणि स्थिर भूमिका’ बजावण्यात भारताला अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पेंटागॉनच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱयाने दिली आहे. भारत वेगाने संरक्षण आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून भारत अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्याच्या या भूमिकेला हिंद-प्रशांत क्षेत्रातही व्यापक रुप देण्यात यावे असे अमेरिकेचे मानणे असल्याचे या अधिकाऱयाने म्हटले आहे.
हिंद-प्रशांत क्षेत्रात व्यापक तसेच स्थिर भूमिका बजावता येईल अशा प्रकारची भागीदारी भारतासोबत सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे. अमेरिका आणि भारतीय सैन्यामधील आंतर-संचालन प्रक्रियेला पुढे नेण्याच्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. दोन्ही देशांचे सैन्य भविष्यातील आव्हानांसाठी उत्तमप्रकारे सज्ज राहतील अशी तयारी करावी लागणार असून याकरता दोन्ही देशांच्या संयुक्त प्रतिक्रियेची गरज भासणार असल्याचे पेंटागॉनच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.