भारताच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करण्याचे आवाहन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात अल्पसंख्य समुदायाच्या लोकांवर अत्याचार पेले जातात असा निष्कर्ष अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य अहवालात काढण्यात आला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप नोंदविला असून अमेरिकेने भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करु नये, अशी सूचनाही त्या देशाला करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या अंतर्गत विभागाकडून दरवर्षी जगातील महत्वाच्या देशांसंबंधीचा अहवाल सादर करण्यात येतो. गेल्यावर्षीच्या अहवालातही भारतात अल्पसंख्य समुदायांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण भारतात होत नाही, अशी टिप्पणी करण्यात आली होती. भारताते त्याहीवेळी या अहवालात विरोध केला होता.
अमेरिका आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आपले देशांतर्गत मतांचे राजकारण घुसडत आहे. भारतात नेहमीच अल्पसंख्याकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यात येत आहे. भारतात या समुदायांना कोणताही त्रास देण्यात येत नाही. त्यामुळे भारतावर असा आरोप करणे हे भारतासंबंधीच्या अज्ञानाचे लक्षण आहे. पूर्ण माहिती न घेताच काही अवांछनीय निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. त्यामुळे हा अहवाल काल्पनिक बाबींवर विसंबून तयार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.
भारतात 2021 मध्येही अल्पसंख्याक व्यक्तींवर हल्ले करणे, त्यांच्या हत्या करणे, त्यांच्या अधिकारांची पायमल्ली करणे असे प्रकार घडत राहिले होते, असे अमेरिकेच्या अहवालात सांगण्यात आले होते. ही माहिती विपर्यस्त असल्याची टीका या अहवालावर केंद्रातील सरकारने केली. भारताने प्रत्युत्तरात अमेरिकेचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला आहे, अशी माहिती परराष्ट्र विभागाने दिली.