कोहली सामनावीर-मालिकावीरचा मानकरी, गिलचे शतक, सिराजचे 4, कुलदीप-शमीचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ तिरुवनंतपूरम
विराट कोहलीचे 45 वे वनडे शतक, शुबमन गिलचे दुसरे शतक आणि पॉवरप्लेमध्ये मोहम्मद सिराजने केलेला भेदक मारा यांच्या बळावर भारताने तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात लंकेचा तब्बल 317 धावांनी फडशा पाडत विश्वविक्रमी विजय नोंदवला. भारताने ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. विराट कोहलीलाच सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले.
391 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना लंकन फलंदाजांनी मोहम्मद सिराजसमोर सपशेल नांगी टाकली. सिराजने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करीत अविष्का फर्नांडो (1) व कुसल मेंडिस (4) यांना झटपट गुंडाळले. यावेळी लंकेची स्थिती 4 षटकांत 2 बाद 22 अशी झाली. लंकेला मोठय़ा भागीदारीची गरज होती. पण सिराजने त्यांना तशी संधीच मिळू दिली नाही. शमीने चरित असालंकाला (1) बाद केल्यानंतर 28 वर्षीय सिराजने पॉवरप्लेमध्ये धुमाकूळ घालत नुवानिंदू फर्नांडो (19) व अष्टपैलू हसरंगा (1) यांना बाद केले. पहिल्या 10 षटकांच्या पॉवरप्लेअखेर लंकेने 5 बाद 39 धावा जमिवल्या होत्या.
यानंतर करुणारत्नेला सिराजने एका धावेवर धावचीत करीत लंकेला आणखी एक धक्का दिला. 6 बाद 39 अशा स्थितीमुळे ते अर्धशतक गाठतात का, अशी शंका निर्माण झाली होती. पण 14.2 षटकांत त्यांनी अर्धशतक गाठण्यात यश मिळविले. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने कर्णधार शनाकाला (26 चेंडूत 11) बाद केल्यानंतर शमीने वेलालगेला 3 धावांवर बाद करीत लंकेची अवस्था 8 बाद 51 अशी केली. कुलदीपने नंतर लाहिरु कुमाराला (9) बाद करीत लंकेतर्फे नोंदवलेली 20 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शेवटचा फलंदाज अशेन बंदारा दुखापतीमुळे फलंदाजीस न आल्यामुळे लंकेचा डाव 22 षटकांत केवळ 73 धावांत संपुष्टात आला. लंकेच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सिराजने 32 धावांत 4, शमीने 20 धावांत 2, कुलदीप यादवने 16 धावांत 2 बळ टिपले.
कोहलीचा एक फटका सीमारेषेनजीक अडवाताना लंकेच्या जेफ्री व्हान्डरसे व अशेन बंदारा यांची जोरदार टक्कर झाली. व्हान्डरसेच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला स्ट्रेचवरून नेण्यात आले. नंतर ते फलंदाजीस आले नाहीत.
कोहलीचा धमाका, गिलचे शतक
तत्पूर्वी, कोहली, शुबमन गिल यांनी नोंदवलेल्या शतकांमुळे भारताने 50 षटकांत 5 बाद 390 धावांचा डोंगर उभारला. कोहलीने वादळी खेळी करताना केवळ 110 चेंडूत 13 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 166 धावा झोपडल्या. गिलने वनडेतील दुसरे शतक नोंदवताना 97 चेंडूत 14 चौकार, 2 षटकारांसह 116 धावा फटकाल्या. या शतकाने त्याने यावर्षी होणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठी रोहितचा सलामीचा जोडीदार म्हणून आपला दावा आणखी भक्कम केला आहे.
दोन शतकी भागीदारी
रोहित व गिल यांनी 95 धावांची सलामी दिल्यानंतर कोहलीने दोन शतकी भागीदारी नोंदवल्या. प्रारंभी सावध सुरुवात केल्यानंतर रोहित-गिल यांनी फटकेबाजी सुरू केली आणि 10 षटकाअखेर बिनबाद 75 धावांची मजल मारली. रोहित मोठी खेळी करणार असे वाटत असताना 16 व्या षटकात करुणारत्नेने त्याला बाद केले. त्याने 49 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 42 धावा जमविल्या. नंतर कोहलीने लंकन गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवित गिलसह धावांची गती वाढवली. गिलने कोहलीसमवेत दुसऱया गडय़ासाठी 131 धावांची भागीदारी केली. त्याला रजिताने त्रिफळाचीत केले.
82 धावांवर असताना विराटला जीवदान मिळाले. सीमारेषजवळ व्हान्डरसेने त्याचा झेल सोडला. त्याचा लाभ विराटने पुरेपूर उठविला. नंतर श्रेयस अय्यरने बॅटिंग कंडिशन्सचा लाभ घेत फटकेबाजी केली. पण तोही फार वेळ टिकला नाही. मात्र कोहलीसमवेत त्याने शतकी भागीदारी नोंदवताना 108 धावांची भागीदारी केली. श्रेयस 32 चेंडूत 38 धावांवर बाद झाला. त्यात 2 चौकार, 1 षटकाराचा समावेश होता. केएल राहुल (7) व सूर्यकुमार यादव (4) अखेरच्या टप्प्यात लवकर बाद झाले. उत्तुंग फटके मारण्याच्या नादात दोघेही डीपमध्ये झेलबाद झाले.
कोहलीची आतषबाजी
कोहलीने शतक पूर्ण झाल्यानंतर फटकेबाजीचा जोर वाढवत चौकार, षटकारांची आतषबाजी केली. शतकानंतर त्याने 7 षटकार मारले, त्यातील दोन शेवटच्या षटकातील होते. अखेरच्या षटकानंतर कोहलीने 166 धावांपर्यंत मजल मारत संघाला चारशेच्या जवळपास मजल मारून दिली. लंकेच्या रजिता व लाहिरु कुमारा यांनी प्रत्येकी 2, चमिका करुणारत्नेने 1 बळी मिळविला.
या मालिकेनंतर भारताची न्यूझीलंडविरुद्ध वनडे व टी-20 मालिका होणार असून 18 जानेवारीस पहिला वनडे सामना हैदराबाद येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः भारत 50 षटकांत 5 बाद 390 ः रोहित शर्मा 42 (49 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), गिल 116 (97 चेंडूत 14 चौकार, 2 षटकार), कोहली नाबाद 166 (110 चेंडूत 13 चौकार, 8 षटकार), श्रेयस अय्यर 38 (32 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), राहुल 7 (6 चेंडूत 1 चौकार), सूर्यकुमार यादव 4, अक्षर पटेल नाबाद 2, अवांतर 15. गोलंदाजाr ः कसुन रजिता 2-81, लाहिरु कुमारा 2-87, करुणारत्ने 1-58, हसरंगा 0-54, व्हान्डरसे 0-59, शनाका 0-19.
लंका 22 षटकांत सर्व बाद 73 ः नुवानिंदू फर्नांडो 19 (27 चेंडूत 4 चौकार), शनाका 11 (26 चेंडूत 2 चौकार), कसुन रजिता नाबाद 13 (19 चेंडूत 2 चौकार), लाहिरु कुमारा 9, अवांतर 10. गोलंदाजी ः सिराज 4-32, शमी 2-20, कुलदीप यादव 2-16.