रिझर्व्ह बँक पतधोरण समितीची बैठक सुरू
वृत्तसंस्था / मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारी सुरू झाली असून बुधवारी 8 जून रोजी रेपो दरातील बदलासंबंधीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. आरबीआयकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढवले जाण्याचे संकेत मिळत असून तसे झाल्यास बँकांकडून वाहन-गृहकर्ज व्याजदरात आणखी वाढ होऊ शकते. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही म्हटले जात आहे. सध्याला 4.40 टक्के इतका रेपो दर आहे.
सोमवारपासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत दोन दिवस रेपोरेटबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. गेल्या 4 मे रोजी आरबीआयने रेपो दरात 0.40 टक्के वाढ केली होती. आता पुन्हा 0.40 टक्के रेपोदरात वाढ होण्याची शक्यता सांगितली जात आहे.