जागतिक डेअरी परिषदेचे नोएडामध्ये उद्घाटन : 2025 पर्यंत प्रत्येक पशूचे होणार लसीकरण
वृत्तसंस्था / नोएडा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रेटर नोएडामध्ये सोमवारी जागतिक डेअरी परिषद 2022 चे उद्घाटन केले आहे. मागील काही काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी नावाच्या आजारामुळे पशूंचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारांसोबत मिळून केंद्र सरकार या आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या वैज्ञानिकांनी लम्पी रोगावरील स्वदेशी लस तयार केली आहे. भारतात आम्ही पशूंच्या युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशनवर भर देत आहोत असे उद्गार मोदींनी परिषदेला संबोधित करताना काढले आहेत.
2025 पर्यंत आम्ही 100 टक्के पशूंचे फूट अँड माउथ डिसिज आणि बुसेलोसिसचे लसीकरण करू असा आम्ही संकल्प केला आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत या आजारांपासून पूर्णपणे मुक्तीचे लक्ष्य आम्ही बाळगले आहे. भारत डेअरी पशूंचा सर्वात मोठा डाटाबेस तयार करत आहे. डेअरी क्षेत्राशी निगडित प्रत्येक पशूचे टॅगिंग होत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. या परिषदेत 50 देशांची शिष्टमंडळे, 800 शेतकऱयांसह सुमारे 1500 प्रतिनिधी सामील झाले आहेत.
बन्नी म्हशीचे दिले उदाहरण
भारतात म्हैस अन् गायींच्या असलेल्या प्रजाती या संकटकाळात स्वतःमध्ये बदल करून घेत तग धरून राहतात. गुजरातमधील बन्नी म्हैस रात्रीच्या कमी तापमानात चरण्यासाठी बाहेर पडते, कारण गुजरातमध्ये दिवसा प्रचंड ऊन असते. रात्रीच्या वेळी म्हशींसोबत त्यांचा पशूपालक नसतो. ही बन्नी म्हैस 15 किलोमीटर अंतरापर्यंत चरण्यासाठी जात असते आणि सूर्योदय होताच स्वतःच्या गोठय़ात परतते. कुणाची बन्नी म्हैस हरवली आहे हे आजवर कानावर पडले नसल्याचे मोदींनी विदेशी शिष्टमंडळांना उद्देशून म्हटले आहे.
दूग्धोत्पादनात 44 टक्क्यांची वाढ
2014 पासून आमच्या सरकारने भारताच्या दूग्धोत्पादन क्षेत्राची क्षमता वाढविण्यासाठी काम केले आहे. याचाच परिणाम म्हणून दूग्धोत्पादनामुळे शेतकऱयांचे उत्पन्न वाढले आहे. 2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दूधाचे उत्पादन व्हायचे. 2022 मध्ये हा आकडा वाढून 210 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे. या 8 वर्षांमध्ये दूध उत्पादनात 44 टक्क्यांची वृद्धी झाल्याचे विधान मोदींनी केले आहे.
डेअरी क्षेत्रात महिलांचा सहभाग
भारताच्या डेअरी क्षेत्रात 70 टक्के महिला आहेत. भारताच्या डेअरी क्षेत्राचे नेतृत्व महिलाच करत आहेत. भारताच्या डेअरी सहकारी संस्थांमध्ये एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य महिलाच आहेत. डेअरी क्षेत्र हे केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत नसून जगभरातील कोटय़वधी लोकांच्या उपजीविकचे प्रमुख साधन आहे. भारतात डेअरी क्षेत्राची खरी शक्ती छोटे शेतकरी आहेत. भारतात डेअरी सहकारी संस्थांचे एक विशाल जाळे असून असे उदाहरण पूर्ण जगात मिळणे अवघड असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
अनेक कंपन्यांचा सहभाग
6900 चौरस मीटर क्षेत्रात प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यात देशातील सर्व प्रमुख कंपन्यांनी भाग घेतला आहे. या प्रदर्शनात अमूल, नंदिनी, मदर डेअरी यासारख्या प्रमुख कंपन्यांनी स्वतःचे स्टॉल उभारले आहेत. पंतप्रधान मोदींनी या प्रदर्शनाची पाहणी करत विविध कंपन्यांची कामगिरी जाणून घेतली आहे. जागतिक डेअरी परिषदेला एकूण 41 दूध कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
मिठाई मॅफ ऑफ इंडिया
दूधाद्वारे शेकडो प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. यातील 61 मिठाई हे देशाच्या विविध राज्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत. जागतिक डेअरी परिषदेत या 61 मिठाईंना ‘मिठाई मॅफ ऑफ इंडिया’ नावाच्या होर्डिंग्सवर प्रदर्शित करण्यात आले आहे.