ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 18 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांचा मृत्यू झाला. तर 13 विद्यार्थी जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रॉब एलिमेंट्री स्कूल असं गोळीबार झालेल्या शाळेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सासच्या उवाल्ड शहरात 18 वर्षीय माजी विद्यार्थ्याने आपल्या आजीला गोळी घातली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा रॉब एलिमेंट्री शाळेकडे वळवला. शाळेत येताना त्याने एका वाहनालाही धडक दिली. शाळेत घुसण्यापूर्वी या हल्लेखोराने बुलेटप्रुफ जाकेट घातले. त्याच्या हातात बंदुक होती. शाळेतील वेगवेगळय़ा वर्गात जाऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 18 निष्पाप विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरालाही पोलिसांनी ठार केलं. या हल्ल्यात 13 विद्यार्थी जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शाळेत घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जे लोक कायदा मोडून हातात बंदूक घेतात, त्यांना आम्ही माफ करणार नाही,’ असं बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केलं आहे. आज अनेक आई-वडील आपल्या मुलांना पुन्हा पाहू शकणार नाहीत. मुलांना गमावण्याची ही वेदना आपल्या शऱिरातून आत्मा काढून घेण्यासारखी आहे. असेही बायडेन यांनी म्हटले आहे.