वृत्तसंस्था/ जकार्ता
मंगळवारपासून येथे सुरू होणाऱया इंडोनेशिया सुपर सिरीज 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि एच.एस. प्रणॉय यांच्या कामगिरीवर भारताचे यश अवलंबून राहील. या स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालची लढत दुसऱया फेरीत कदाचीत कॅरोलिना मॅरीनशी होण्याची शक्यता आहे.
अलिकडे भारतीय पुरूष बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये नवा इतिहास घडविताना थॉमस चषक स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत भारताने बलाढय़ तसेच 14 वेळा थॉमस चषक जिंकणाऱया इंडोनेशियाचा पराभव केला. या कामगिरीमुळे भारतीय पुरूष बॅडमिंटनपटूंचा दर्जा निश्चितच सुधारला आहे. मंगळवारपासून येथे सुरू होणाऱया इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत नवव्या मानांकित लक्ष्य सेनचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कचा व्हिटींगस बरोबर होणार आहे. 2020 साली झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि व्हिटींगस यांच्यात शेवटचा सामना झाला होता. 20 वर्षीय लक्ष्य सेनची व्हिटींगसविरूद्धची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली आहे. इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत सहभागी झालेला नाही. या स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये भारताचे लक्ष्य सेन, एच.एस.प्रणॉय, पी. कश्यप आणि समीर वर्मा यांचा समावेश आहे. एच.एस.प्रणॉयचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या गिमेकीशी तर कश्यप आणि वेंग यांच्यात पहिल्या फेरीतील सामना होईल.
महिलांच्या विभागात सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनशी होणार आहे. पुरूष दुहेरीत मनु अत्री आणि सुमीत रेड्डी तसेच महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी तसेच सिमरन सिंघी आणि रितीका ठक्कर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.