Indurikar Maharaj mother in Law joins BJP : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आम्ही वारकरी आहोत. राजकारण हे आमचं क्षेत्र नाही.राजकारणात चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील असं इंदुरीकर महाराज मला म्हणाले होते. मात्र,गावाच्या विकासासाठी मी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीनं ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिलं. निवडणुकीत मी जनतेला काही विकासकामांची आश्वासनं दिली होती. ती पूर्ण करण्यासाठीच मी आता भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचेही त्या म्हणाल्या.
कोण आहेत शशिकला पवार
शशिकला पवार या माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा तालुका असलेल्या संगमनेरमधील निळवंडे गावच्या सरपंच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नारळ या चिन्हावर त्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला पवार यांचा २२७ मतांनी पराभव केला होता. विजयानंतर त्यांना निळवंडे ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषवण्याची संधी मिळाली आहे.

