आता फक्त मस्क व बेजॉसच पुढे ः अदानींची नेटवर्थ 11 लाख कोटी रुपयाच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील दिग्गज उद्योगपतीपैकी एक असणारे गौतम अदानी यांनी 137.4 अब्ज डॉलर (जवळपास 11 लाख कोटी रुपये) इतक्या नेटवर्थसोबत जगातील श्रीमंतामध्ये तिसऱया नंबरचे धनाढय़ बनले आहेत. फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्टला मागे टाकत त्यांनी ही कामगिरी प्राप्त केली आहे. हे प्रथमच असे झाले असून यामध्ये आशियाई ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सच्या पहिल्या तीनमध्ये समावेश झाल्याची माहिती आहे.
आता ते रँकिंगमध्ये फक्त टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क व ऍमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजॉस यांच्या मागे आहेत. मस्क यांचा 251 बिलियन डॉलरसोबत त्यांचा धनाढय़ांच्या यादीत पहिला नंबर लागतो. तर बेजॉस 153 अब्ज डॉलरसह दुसऱया स्थानी असून पहिल्या दहा जणांच्या यादीत एकमेव भारतीय म्हणून गौतम अदानी तर जगात तिसऱया नंबरचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. 191.9 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी 11 व्या स्थानी राहिले आहेत.
एप्रिल 2021 मध्ये 57 अब्ज डॉलर संपत्ती
अदानी यांचा 4 एप्रिल रोजी सेंटीबिलियनेयर्स क्लबमध्ये समावेश झाला आहे. 100 बिलियन डॉलरपेक्षा जादा नेटवर्थ असणाऱया व्यक्तींना सेंटीबिलियनेयर म्हटले जाते. एक वर्षाच्या अगोदर एप्रिल 2021 मध्ये अदानींची संपत्ती 57 अब्ज डॉलर होती. आर्थिक वर्ष 2021 ते 2022 मध्ये अदानी यांची संपत्ती जगातील सर्वाधिक वेगाने वाढली आहे.