46 मिनिटांपर्यंत भारतीय सीमेत राहिला ड्रोन
वृत्तसंस्था / गुरदासपूर
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील दोरांगला भागात बीएसएफची चौकी असलेल्या आदियां येथे शुक्रवारी रात्री उशिरा चारवेळी पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या. बीएसएफच्या जवानांकडून गोळीबार करण्यात आल्याने ड्रोन पाकिस्तानात परतला. त्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी संबंधित भागात शोधमोहीम राबविण्यात आली. बीएसएफचे महानिरीक्षक आणि गुरदासपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी स्वतः जात घटनास्थळाची पाहणी केली.
बीएसएफ 58 बटालियनच्या जवानांनी प्रथम रात्री सुमारे 11.40 वाजता पाकिस्तानी ड्रोनचा आवाज ऐकला आणि त्याला लक्ष्य करत त्यांनी गोळीबार सुरू केला. सुमारे 11 मिनिटांनी ड्रोन पाकिस्तानात परत गेला. अशाचप्रकारे पहाटे 3 वाजेपर्यंत एकूण 4 वेळा ड्रोन भारतीय हद्दीत आला होता. एकूण 45 मिनिटांपर्यंत हा ड्रोन भारतीय सीमेत होता.
या घुसखोरीनंतर बीएसएफ आणि गुरदासपूर पोलिसांकडून पहाटेच शोधमोहीम हाती घेण्यात आली. यासंबंधी बीएसएफ पंजाब प्रंटियरचे महानिरीक्षक आसिफ जलाल आणि गुरदासपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरजीत सिंह यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. या अधिकाऱयांनी सीमावर्ती क्षेत्रात वास्तव्य करणाऱया लोकांशी संवाद साधत सहकार्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांकडून सीमावर्ती भागांमधील गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी बीएसएफसोबत मिळून सीमावर्ती भागातील लोकांसोबत बैठक घेत सहकार्याचे आवाहन केल्याचे हरजीत सिंह यांनी सांगितले. कुठल्याही ड्रोनसंबंधी माहिती देणाऱयास एक लाख रुपयांचे इनाम देण्यात येणार असून यासंबंधी हेल्पलाइन नंबर देखील जारी करण्यात आल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले.