Tarun Bharat

मनपाच्या संकेतस्थळावरून माहिती गायब

Advertisements

प्रशासनाने इतिवृत्तांची माहिती हटविल्याने कारभाराबद्दल संशय : संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी  /बेळगाव

महापालिकेचा कारभार संगणकीकृत करण्यासाठी विविध सुविधा ऑनलाईनद्वारे उपलब्ध केल्या आहेत. तसेच तक्रार नोंदविणे किंवा अन्य माहितीसाठी मनपाच्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन केले जाते. मात्र लोकनियुक्त सभागृहात झालेल्या बैठका आणि प्रशासकीय कालावधीत मंजूर झालेल्या ठरावांची कोणतीच माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. संकेतस्थळावरून इतिवृत्ताची माहिती हटविण्यामागचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या पेपरलेस कारभार करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. याकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. महापालिका कार्यालये शहरवासियांचे केंद्रबिंदू आहे. नागरी सुविधा असो किंवा कोणत्याही अडचणीकरिता महापालिका कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांचा संपर्क मोठय़ा प्रमाणात असतो. नागरिकांची होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुविधा संगणकीकृत करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. ऑनलाईन उतारे, संगणकीकृत जन्म-मृत्यू दाखले, ई-निर्माणच्या माध्यमातून इमारत बांधकाम परवाना देण्यात येत आहे. तसेच मालमत्तांची नोंद संगणकीकृत करून ऑनलाईनद्वारे घरबसल्या घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीदेखील स्वीकारण्यासाठी
ऍप तयार करण्यात आले आहे. अशी सर्वच माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महापालिकेच्या अधिकाऱयांची आणि कर्मचाऱयांची माहितीदेखील उपलब्ध आहे. तसेच लोकनियुक्त सभागृहातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक, वॉर्ड क्रमांक, वॉर्डची माहिती, असा तपशील उपलब्ध करण्यात येतो.

माहिती हटविल्याने कारभाराबद्दल संशय

लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपल्यानंतर नगरसेवकांच्या यादीसह लोकनियुक्त सभागृहात मंजूर केलेल्या ठरावांचे इतिवृत्तदेखील संकेतस्थळावरून हटविण्यात आले आहे. वास्तविक, नागरिकांना कोणत्याही ठरावाची माहिती किंवा सभागृहाने मंजुरी दिलेल्या ठरावांचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत असे. पण सर्व इतिवृत्तांची माहिती संकेतस्थळावरून हटविण्यात आली आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू असून प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या इतिवृत्ताची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करणे आवश्यक आहे. पण महापालिकेने ही माहिती उपलब्ध केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाचा कारभार पारदर्शी असणे आवश्यक आहे. पण महापालिका प्रशासनाने इतिवृत्तांची माहिती हटविल्याने कारभाराबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. लोकनियुक्त सभागृहात आणि प्रशासकीय राजवटीत कोणते ठराव मंजूर करण्यात आले. याची माहिती घेण्यासाठी महापालिका कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन इतिवृत्तांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

धनादेशाद्वारे वेतन,पीडीओंचे नैतिक पतन?

Amit Kulkarni

चैत्रोत्सव हुकल्याची हुरहुर दाटली…!

Omkar B

शवदाहिनी परिवर्तनाचा प्रस्ताव बासनात

Amit Kulkarni

वीरजवान मंजुनाथ गौडण्णवर अनंतात विलीन

Amit Kulkarni

कोरोना योद्धय़ांना महागाई भत्ता- नोकरीत कायम करा

Patil_p

मुतगा येथील भावकेश्वरी देवी यात्रेची सांगता

Amit Kulkarni
error: Content is protected !!