नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ट्विटरच्या 40 कोटी उपयोगकर्त्यांच्या व्यक्तीगत माहितीची चोरी झाली आहे. या कंपनीच्या वेबसाईटवर हॅकर्सनी सायबर हल्ला केला असून तो यशस्वी ठरल्याचा दावा सायबर हल्लेखोरांनी केला आहे. ही माहिती आता डार्क वेबवर विकण्यासाठी घालण्यात आली आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
इस्रायलची सायबर गुप्तचर संस्था हडसन राकने दिलेल्या माहितीनुसार चोरण्यात आलेल्या माहितीमध्ये जगातील अनेक महनीय व्यक्तीच्या व्यक्तीगत माहितीचा समावेश आहे. या माहितीत या ग्राहकांचा ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक अशा महत्वाच्या माहितीचाही समावेश आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि अमेरिकेचा गायक चार्ली पुथ याच्यासह अनेकांचा डाटा चोरीला केल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती चोरणाऱया सायबर हल्लेखोराने ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनाही याची माहिती दिली आहे.
मस्क यांना धमकी
माहिती चोरणाऱयांनी आता मस्क यांच्याशी सौदेबाजी सुरु केली आहे. माहिती चोरीला गेल्यामुळे मस्क यांच्या ट्विटर कंपनीला आता मोठा दंड भरावा लागेल. तसे झाल्यास कंपनीची मोठय़ा प्रमाणात हानी होईल. ती टाळायची असेल तर चोरलेली माहिती मस्क यांनी विकत घ्यावी. तसे केल्यास सर्व उपयोगकर्त्यांची माहिती त्यांना परत मिळेल आणि त्यांची दंडापासून सुटका होईल, असा संदेश या सायबर हल्लेखोरांनी मस्क यांना पाठविला असल्याचेही सांगण्यात आले आहे.
भारताचीही माहिती धोक्यात
भारताचा सूचना प्रसारण विभाग आणि विश्व आरोग्य संघटना डब्ल्यूएचओची माहितीही चोरीला गेल्याचे वृत्त आहे. यामुळे भारत सरकारची काही प्रमाणात हानी होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने मात्र अद्याप आपल्या विभागाची माहिती चोरीला गेल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.