स्वयंसेवकांना दिले जाणार प्रशिक्षण ः केंद्रीय मंत्रीही होणार मोहिमेत सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतासह जगभरात पर्यावरणसंबंधी चिंता सातत्याने वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण रक्षणासंबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेकदा इशारा देण्यात आला आहे. अशा स्थितीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण रक्षणासाठी सरसावला आहे. संघाने या प्रकरणी एक विभागच तयार केला असून राष्ट्रीय पातळीवर संघाचे वरिष्ठ प्रचारक गोपाळ आर्य याचे प्रभारी आहेत.
पर्यावरणासारख्या विषयाचे गांभीर्य जगासमोर मांडण्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी अजेंडा तयार करण्यासाठी सरसावलेल्या संघाने या पूर्ण मोहिमेला ‘सुमंगलम’ नाव दिले आहे. या मोहिमेचा व्यापक स्वरुपात प्रभाव दिसून यावा म्हणून यात पर्यावरणाशी संबंधित संघाच्या संघटनांसोबत भारत सरकारची काही मंत्रालये देखील भाग घेत आहेत. 5 केंद्रीय मंत्री या मोहिमेत थेट स्वरुपात जोडले जातील. संघ आणि सरकार यांच्यातील ताळमेळीद्वारे राबविण्यात येणाऱया या मोहिमेशी शेतकरी तसेच सर्वसामान्यांना जोडण्यावर भर राहणार आहे. याकरता स्वयंसेवकांसोबत शेतकरी, विद्यार्थ्यांनाही या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याचबरोबर मोहिमेच्या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठीच्या भारतीय दृष्टीकोनावर तसेच याच्या अन्य पद्धतींवरही चर्चा होणार आहे.
सुमंगलम मोहिमेच्या अंतर्गत पंचतत्वांवर एक आंतराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. याचबरोबर क्षेत्रीय स्तरांवर देखील चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चासत्रांमधून निघणारे निष्कर्ष आणि अनुभव या सर्वांना मिळून एक व्यापक चर्चासत्र दिल्लीत मे 2023 मध्ये तज्ञांसोबत आयोजित करण्यात येईल. या पूर्ण मोहिमेत दीनदयाळ संशोधन संस्थेला जल घटकावर चर्चेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशाचप्रकारे अन्य सहकारी संघटना उर्वरित घटकांवर काम करण्याची योजना आखत आहेत.