प्रतिनिधी /वास्को
संपूर्ण मुरगाव तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात जोरदार पाऊस कोसळला. या पावसात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. झुआरीनगरात कुंपण कोसळल्याने एक व्यक्ती जखमी झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत काही चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. चिखलीतील मैदानाचे कुंपणही शुक्रवारच्या पावसात कोसळले.
शुक्रवारी सकाळपासूनच मुरगाव तालुक्यातील मुरगाव, वास्को, दाबोळी तसेच कुठ्ठाळी परिसरात जोरदार पाऊस कोसळला. दुपारनंतर पावसाने थोडी उसंत घेतली. परंतु संध्याकाळी व रात्रीही जोरदार बरसला. सततच्या पावसामुळे मोठय़ा नुकसानीची कोणतीही घटना घडल्याची नोंद झाली नाही. मात्र, किरकोळ पडझड बऱयाच ठिकाणी झाली. मेर्सिस वाडे, वाडे इतर सखल भागांमध्ये नाले भरून वाहू लागले. काही घरांच्या वरच्या पायरीपर्यंत पाणी पोहोचले होते. तर काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. लोकांमध्ये चिंताही पसरली होती. मात्र, दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने समस्या थोडी हलकी झाली.
झुआरीनगरात कुंपण कोसळून एक जखमी, वाहनांचेही नुकसान
सकाळी आठ साडे आठच्या सुमारास झुआरीनगरातील विद्यानगर परिसरात एका निवासी वसाहतीचे कुंपण कोसळले. कुंपणाच्या बाजूच्या खुल्या जमिनीवर साधारण दीड मिटर उंच पाणी भरले होते. या पाण्याच्या दाबाने दगडी कुंपण कोसळून समुद्राच्या लाटेप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट त्या निवासी वसाहतीत घुसला. या घटनेत त्या ठिकाणी उभे असलेले रहिवासी संस्थेचे सचिव विजय सावंत जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. शिवाय कुंपणाच्या आत पार्क केलेल्या काही चार चाकी वाहनांचे या घटनेत नुकसान झाले. कुठ्ठाळीचे आमदार अँन्थनी वास यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तेथील समस्याही जाणून घेतली. या पावसात चिखलीतील विमानतळ मार्गावरील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानाचे कुंपणही कोसळले. सुदैवाने या अपघातात कुणीही सापडला नाही.