सर्रास विद्यार्थ्यांचे गुण जैसे थे : न्यायालयात जाण्याचा पालकांचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज केला होता. परंतु सर्रास विद्यार्थ्यांचे गुण आहेत तेच आले आहेत. उत्तरपत्रिकेची तपासणी करताना गुण वाढत असतानाही विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आलेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पदवीपूर्व विभागाकडून होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, काही पालकांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बारावीचे गुण हे पुढच्या शिक्षणासाठी महत्त्वाचे असतात. पेपर तपासणी करताना काहीवेळा नजरचुकीने गुण कमी-जास्त होतात. गुण कमी झाले आहेत, ते पुनर्तपासणीमध्ये वाढतील, असा आत्मविश्वास असणारे विद्यार्थी पुनर्तपासणीसाठी अर्ज करतात. यावषी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी 1 हजार 670 रुपये खर्च करून पुनर्तपासणीसाठी अर्ज केले होते. काही विद्यार्थ्यांनी तर 10 हजार 20 रुपये भरून सर्वच विषयांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी पाठविल्या होत्या.
विद्यार्थ्यांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न
पुनर्तपासणीचे गुण विद्यार्थ्यांना प्राप्त झाले असून, सर्रास विद्यार्थ्यांना ‘नो चेंजिस’ अशी उत्तरे मिळाली आहेत. राज्यातील पुनर्तपासणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करता 1 कोटी 79 लाख रुपये केवळ पुनर्तपासणीचे शुल्क पदवीपूर्व विभागाकडे जमा झाले आहेत. सर्रास विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, 10 ते 15 गुणांची वाढ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पालकांची न्यायालयात जाण्याची तयारी
पुनर्तपासणीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण वाढल्यास ज्या शिक्षकाने पेपर तपासणी केली त्यांना दंड आकारला जातो. ही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पुनर्तपासणीमध्ये गुण वाढविले जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पदवीपूर्व विभागाच्या या भेंगळ कारभाराविरोधात बेळगावसह आसपासच्या भागातील काही पालकांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.