पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी /पर्वरी
पर्वरीत जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे बेकायदा जमीन बळकावणयाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच एका प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
साल्वादोर दी मुंद येथील सर्वे. क्र.78/20 आणि 78/21 येथील डोंगरावरील जमिनीचा कब्जा केल्या प्रकरणाची खंवटे यांनी अधिकाऱयांसमवेत पाहणी करून योग्य चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. यावेळी नगर नियोजन खाते, वन खाते,सार्वजनिक बांधकाम खाते, पर्वरी पोलिस तसेच वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
सदर या सर्वे क्रमांकातील डोंगरावरील ‘नो डेव्हेलपमेंट झोन’’ मध्ये बेकायदा झाडांची कत्तल करून संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. हे बेकायदेशीर प्रकार खात्याच्या संगमनमताने होत आहेत. हे प्रकार आमदारच्या आशीर्वादाने चालले असल्याचे आरोप केले जातात. त्यामुळे माझे नाव बदनाम होते. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून खात्याला आदेश द्यावे. असे खंवटे यांनी सांगितले. नगर नियोजन खात्याने हे बांधकाम कायदेशीर आहे का नाही हे तपासून पाहावे अन्यथा त्यांचा बांधकाम परवाना रद्द करावा. या प्रकरणी पर्वरी पोलिसांत तक्रार नोंदवली असून त्यानीही तातडीने तपास करावा, अशी मागणी खंवटे यांनी केली आहे. दरम्यान साल्वादोर दी मुंद पंचयातीने बिल्डर व जमीन मालकाला बांधकाम बंद ठेवण्याची नोटिस बजावली आहे.