मार्केट परिसरात सांडपाणी न सोडण्याचे आवाहन
प्रतिनिधी /मडगाव
माडेल येथील मासळी मार्केटचे काम चालू असले, तरी येथील घाऊक मासळी मार्केट तात्पुरते स्थलांतरित केले गेले नसल्याने येथे दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारींची दखल घेत एसजीपीडीएचे अध्यक्ष असलेले आमदार दाजी साळकर यांनी अधिकाऱयांना घेऊन शुक्रवारी सकाळी पाहणी केली. यावेळी आवश्यक साफसफाई करून मार्केटमध्ये जागोजागी पडलेले खड्डे खडी घालून बुजविण्यात आले. सांडपाणी साठून राहू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येथे व्यवसाय करणाऱया मासळी विक्रेत्यांनी स्वतःहून मासळीचे सांडपाणी बाजार परिसरात टाकून न देता ते गटारात खाली केल्यास दुर्गंधीवर मात करणे शक्य आहे. मात्र विक्रेते असे करताना दिसत नसून मार्केट परिसरातच जागोजागी सांडपाणी सांडले जात असल्याने दुर्गंधी पसरत असल्याचे आढळून येते. लोक नंतर प्राधिकरणाला दोष देत असतात, याकडे साळकर यांनी लक्ष वेधले
स्थलांतराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मार्केट तात्पुरते स्थलांतरित करण्यासाठी काही आर्थिक बाजूंची पडताळणी करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर काय तो लवकरच निर्णय घेतला जाईल, असे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. नवीन मासळी मार्केटची उभारणी झाल्यानंतर दुर्गंधीची समस्या भेडसावणार नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यात 200 ते 250 मासळीवाहू वाहने समावून घेणे शक्य होणार असून येथे कोल्ड स्टोअरेज व अन्य सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. मासळी मार्केटच्या बाहेरील परिसरात बेकायदा मासेविक्री करून दुर्गंधी पसरविणाऱयांवर मडगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱयांना विश्वासात घेऊन कारवाई करणार असल्याचे आमदार साळकर यांनी स्पष्ट केले.