आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राची घेतली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट रुग्णालयात बाहय़ रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच आयुष्य विभागाच्यावतीने आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला भेट देऊन आयुर्वेदिक चिकित्सा विभागाची पाहणी केली. रुग्णालयातील सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
कॅन्टोन्मेंट परिसरातील रुग्णांच्या सुविधेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. बाहय़रुग्णांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. तसेच देशातील 37 कॅन्टोन्मेंटमध्ये आयुष्यतर्फे आयुर्वेदिक चिकित्सा केंदे सुरू केली आहेत. यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंटचा समावेश केला आहे. त्यामुळे मागील महिन्यात सदर आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देऊन सुरुवात केली आहे. या केंद्राची पाहणी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केली. तसेच रुग्णालयाची पाहणी करून कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत? याची माहिती जाणून घेतली. आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच आरोग्य सेवा उत्कृष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असे सांगितले. रुग्णालयाच्यावतीने उपलब्ध करण्यात आलेल्या सेवांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सरकार नियुक्त सदस्य, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.