प्रतिनिधी / बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या व इतर अधिकाऱयांनी मिरवणूक मार्गाची पायी चालत पाहणी केली. उत्सवाच्या काळात कोणती खबरदारी घ्यायची, यासंबंधी त्यांनी अधिकाऱयांशी चर्चाही केली.
पोलीस आयुक्तांसमवेत उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी, वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी आदींसह शहरातील अनेक अधिकाऱयांचा यामध्ये समावेश होता.
बुधवारी पोलीस आयुक्तांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती. गुरुवारी दुपारी पुन्हा पायी चालत मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. कित्तूर चन्नम्मा चौकापासून कपिलतीर्थापर्यंत या अधिकाऱयांनी पायपीट केली. मिरवणुकीची सुरुवात कोठून होते, मिरवणुकीत किती मूर्ती सहभागी होतात, कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावात किती मूर्तींचे विसर्जन होते, इतर तलावांत कोणत्या सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन केले जाते, आदींविषयी आयुक्तांनी आपल्या अधिकाऱयांकडून माहिती घेतली.