राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमारांचा शहरात फेरफटका
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार बेळगावला दाखल झाले आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी चव्हाट गल्ली, खडक गल्ली, गणपत गल्ली यासह इतर परिसराला भेट दिली. त्यांनी अधिकाऱयांबरोबर चर्चा करून बंदोबस्त ठेवण्याबाबत सूचना केली.
बेळगावचा गणेशोत्सव सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. बेळगावची मिरवणूक भव्य असते. त्यामुळे या काळात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवणे महत्त्वाचे असते. त्या पार्श्वभूमीवर अलोककुमार बेळगावला आले आहेत. त्यांनी विविध भागाला भेट देऊन पाहणी केली. कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नयेत याकडे लक्ष देण्याबाबत त्यांनी अधिकाऱयांना सूचना केली.
यावेळी त्यांच्या सोबत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
राखीव पोलिसांचे शहरातून पथसंचलन
गणेशोत्सव मिरवणूक मार्गासह विविध चौकांमध्ये शक्तिप्रदर्शन
गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरातून पथसंचलन केले. मिरवणूक मार्गाबरोबरच विविध चौकांमध्ये पोलिसांनी पथसंचलन करून शक्तिप्रदर्शन केले आहे. यामध्ये पोलिसांबरोबर राखीव दलाच्या तुकडय़ा या पथसंचलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
कित्तूर चन्नम्मा चौक, काकतीवेस, खडक गल्ली, शनिवारखूट यासह शहरातील इतर भागांतून पोलिसांनी मंगळवारी दुपारी पथसंचलन केले. बंदोबस्तासाठी विविध जिल्हय़ांतून आलेल्या पोलिसांनी या पथसंचलनात भाग घेतला. शहरातील विविध मार्गांवरून पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले.
राज्यातील विविध जिल्हय़ांतून बंदोबस्तासाठी बळ मागविण्यात आले आहे. दरम्यान, मराठा मंडळ हायस्कूलपासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एका बेळगाव शहरात 380 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तालुक्यातील विविध खेडय़ांमध्ये सार्वजनिक 922 श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. बेळगाव शहर व तालुका वगळता जिल्हय़ात ही संख्या 2 हजार 960 हून अधिक आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मंगळवारी पथसंचलन केले आहे.
शहरातून पथसंचलन करून या सर्व तुकडय़ा कित्तूर चन्नम्मा चौक येथे दाखल झाल्या होत्या. त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱयांनी मार्गदर्शन करून या पथसंचलनाची सांगता केली.