रणदीप हुड्डा, उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाची आगामी सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ अत्यंत चर्चेत आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात रणदीप हुड्डा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील दिसून येणार आहे. याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री इरा मोर देखील यात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. इरा मोर या सीरिजच्या माध्यमातून हिंदी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
उत्तरप्रदेशातील माफियाच्या विरोधात लढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका रणदीपने यात साकारली आहे. ही सीरिज उत्तरप्रदेशातील पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे. अविनाश मिश्रा यांनी शस्त्रास्त्र माफियांच्या विरोधात 1990 च्या दशकात कायदेशीर लढा दिला होता.
एक अभिनेता म्हणून नेहमीच कालौघात विसर पडलेल्या नायकांच्या खऱ्या आयुष्याच्या कहाणींकडे मी आकर्षित होतो. अशाप्रकारच्या कहाण्या आमच्या लोकांचे संघर्ष अन् विजय दर्शवितात. मिश्रा यांची कहाणी ही आधुनिक रॉबिनहुडपेक्षा कमी नाही, गुन्ह्याविरोधात लढणे आणि सत्यासाठी उभे राहण्याचे काम त्यांनी केले होते, असे रणदीपने ट्विट करत म्हटले आहे. ही सीरिज 18 मे रोजी जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.