खात्यामध्ये ‘एरर’ असल्याच्या तक्रारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या आठवडय़ात व्हॉट्सअप डाऊनने गोंधळ माजवल्यानंतर सोमवारी इन्स्टाग्राम सर्व्हर डाउन झाल्याने लाखो वापरकर्ते हैराण झाले. भारतात देखील काही वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे, तर काही खाती उत्तम प्रकारे चालू आहेत. सर्व्हर डाउन समस्येमुळे अनेक ग्राहक आपले अकाऊंट लॉग इन करू शकत नव्हते. तसेच कित्येक जणांनी आपले खाते निलंबित केल्याचा ‘एरर’ दाखवत असल्याचा दावा केला होता. कंपनीने सर्व्हर डाउनची ही समस्या मान्य केली असून आम्ही ही समस्या सोडवण्याचे काम करत आहोत, असे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या आठवडय़ातच दिवाळी सणादरम्यान ‘व्हॉट्सऍप-मेटा’चे सर्व्हर डाउन झाले होते. यामुळे जगभरातील यूजर्सना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले. जगभरात जवळपास 2 तास व्हॉट्सऍप डाउन होते. त्यामागे सर्व्हर डाऊनची समस्या कंपनीने सांगितली होती. मात्र, सोमवारी फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सऍप यांसारखे ‘मेटा’चे इतर प्लॅटफॉर्म व्यवस्थित चालू होते.